पर्यटकांनो, धरण परिसरात जरा सांभाळून!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

वीजनिर्मितीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात टाटा पॉवरने बांधलेले ठोकळवाडी धरण हे पोहण्यासाठी व नौकाविहारासाठी धोकादायक आहे, टाटा पॉवरने ठिकठिकाणी धोक्‍याच्या सूचना दिल्या आहेत.

कामशेत - वीजनिर्मितीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात टाटा पॉवरने बांधलेले ठोकळवाडी धरण हे पोहण्यासाठी व नौकाविहारासाठी धोकादायक आहे, टाटा पॉवरने ठिकठिकाणी धोक्‍याच्या सूचना दिल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करीत हौशी पर्यटक जीव धोक्‍यात घालून पोहण्यासाठी पाण्यात उतरत आहेत. पर्यटकांचा हा आततायीपणा जिवावर बेतत आहे.

रविवारी (ता. ३१) फुगेवाडीतील कृष्णकांत जाधव हा धरणाच्या पात्रात पोहण्यासाठी उतरला. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दम लागून तो पाण्यात बुडाला. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड परिसरातील ५४ वर्षीय महिला पर्यटक बोरवली गावाजवळ याच धरणाच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू पावली. वडेश्‍वरजवळ या धरणाचा पाया असून, खांडी सावळा परिसरात धरणाचे बॅकवॉटर अंथागपणे पसरले आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला धनिकांनी मोठे फॉर्म हाउस बांधले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाण्यालगतच्या जागांना सोन्याचा भाव आला आहे. या परिसरातील हजारो हेक्‍टर जमिनीची विक्री झाली आहे. या जमिनीभोवती संरक्षक कुंपणही घातले आहे. बाराही महिने हा परिसर पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. 
हेरिटेज वॉक आणि धरणाच्या अंथाग पाण्याची भुरळ पडल्याने देशविदेशांतील हजारो पर्यटक येथे येतात. त्यामुळे रोजगार वाढला असला, तरी पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे काहीसे विरजण घालत आहे. या दोन घटना धरणाच्या कुशीत झाल्या असे नाही, पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या कित्येक घटना येथे झाल्या आहेत. टाटा प्रशासन, पोलिस अधिकारी, स्थानिक गावकरी आपापल्या परीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमच प्रयत्नशील आहेत. पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे माळेगावचे माजी सरपंच बाळासाहेब खंडागळे यांनी सांगितले. परिसरातील तीव्र खोलीच्या ठिकाणी राजरोसपणे पर्यटकांचा धिंगाणा सुरू असतो, अशी खंत अनेकांनी बोलून दाखवली. टाटा पॉवर प्रशासनाने वडेश्‍वर, शिंदेवाडी, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसूर, खांडी, पिंपरी, माळेगाव, किवळेसह अन्य ठिकाणी पाण्यालगतच्या जागेवर सुरक्षिततेची माहिती देणारे फलक लावून कारवाईचा इशारा दिला आहे. टाटा पॉवरने येथे लावलेल्या फलकांवर स्पष्टपणे लिहिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिनिषिद्ध ठिकाण 
पहिल्या फलकात म्हटले आहे, की हे ठिकाण सरकारी गुप्त गोष्टींबाबत अधिनियम १९२३ (१९२३ चा १९) यांचे कलम क्रमांक दोन खंड (८) यांच्या उपखंड (क) व (ड) यानुसार प्रतिनिषिद्ध ठिकाण असल्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. अधिनियम भंग करणाऱ्या विरुद्ध अधिनियमानुसार कारवाई केली जाईल. दुसऱ्या फलकात म्हटले आहे, की धरणात सरपटणारे प्राणी, नको असलेली वनस्पती, भुसभुशीत जमीन, वाळू असल्याने हा तलाव धोकादायक असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. तिसऱ्या फलकांवर अशाच धोक्‍याच्या व कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

फुगेवाडीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
रविवारी ठोकळवाडी धरणाच्या पाण्यात बुडालेला फुगेवाडीतील महाविद्यालयीन विद्यार्थी कृष्णकांत मुरलीधर जाधव (वय २०) याचा मृतदेह सापडला. तो पोहण्यासाठी धरणाच्या पात्रात उतरला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. शिवदुर्ग रेस्क्‍यू टीमने रविवारी दिवसभर त्याचा शोध घेतला. परंतु, त्याचा शोध लागला नव्हता. सोमवारी (ता. १) साडेबाराच्या सुमारास शिवदुर्ग रेस्क्‍यू टीमला त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. तळेगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists should be careful in the dam area