Traffic Issue in pimpri chichwad
Traffic Issue in pimpri chichwadsakal

Traffic Issue : वाहतूक कोंडीने श्‍वास ‘कोंडला’! पिंपरी- चिंचवडसह मुंबईकरांचीही वाढली डोकेदुखी

पिंपरी-चिंचवडसह तळेगाव, चाकण एमआयडीसी परिसरात वाहनांची गती संथ

तळेगाव स्टेशन - तळेगाव, चाकण ‘एमआयडीसी’च्या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने पिंपरी- चिंचवडसह मुंबईकरांचीही डोकेदुखी वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रलंबित असलेला जेमतेम २० किलोमीटरचा तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा मुद्दा सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवार अथवा मतदारांकडून साधा चर्चेतही नाही.

औद्योगिक विकासामुळे गेल्या दोन दशकांत अवजड वाहनांच्या रहदारीने ओसंडून वाहू लागलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता राजकीय अनास्था आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे प्रतीक बनला आहे. अरुंद आणि खराब रस्ता, वाढती अतिक्रमणे, रस्त्याकडेची अवजड वाहनांची पार्किंग, वाहन चालकांचा बेशिस्तपणा आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे तळेगाव-चाकण रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.

औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांची, दुचाकी, चारचाकी वाहने, कामगार वाहतुकीच्या बस, मालवाहतुकीची वाहने यात तास न् तास अडकून पडतात. मुंबईत रहिवासास असलेले उत्तर पुणे जिल्ह्यातील हजारो प्रवासी या रस्त्याने गावाकडे ये- जा करतात. त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. याशिवाय यामार्गे नाशिककडे जाणारे पुणे- पिंपरी चिंचवडमधील वाहनधारकही अनेकदा या कोंडीत अडकतात.

इंधन आणि वेळेचा मोठा अपव्यय होतो. नित्याच्या वाहतूक कोंडीसह अति अपघातप्रवण बनलेल्या या मार्गावरुन जाताना लागणारा वेळ आणि गेल्या काही वर्षांमध्ये अपघातात बळी पडलेल्यांची संख्या धडकी भरवणारी आहे. या पार्श्वभूमीवर जेवढ्या गांभीर्याने आणि प्रकर्षाने तळेगाव-चाकण महामार्गाच्या प्रलंबित कामाचा मुद्दा चर्चिला जायला हवा, तितका तो दिसत नाही.

देशभरात चाकण एमआयडीसीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्या, हजारो छोटे मोठे उद्योग व लाखो कामगार या ठिकाणी काम करतात. देशात सर्वाधिक कर देणाऱ्या या औद्योगिक क्षेत्रातील दैनंदिन वाहतुकीचा मूळ प्रश्नच गंभीर बनला आहे. जेमतेम चार-पाच किलोमीटर अंतर कापायला किमान एक तास लागतो.

कर्मचारीदेखील चाकण परिसरामध्ये नोकरी करायला आता लवकर तयार होत नाहीत. कामावर येताना व जाताना किमान दीड दोन तास फक्त प्रवासातच जातात. केंद्र शासनाने याप्रश्नी लक्ष घालून, नवीन पायाभूत सुविधा विकसित करून हा रोजचा वाहतुकीचा खेळखंडोबा संपवावा.

- जयदेव अक्कलकोटे, अध्यक्ष, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. राजकीय नेतृत्व जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करतात की काय, अशी शंका सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

- आशिष ढगे पाटील, (तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता सुधारणा चळवळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com