
देहू : देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांनी मंगळवारी (ता. 8) काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे देहूचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याचे जाहीर केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आमदार सुनील शेळके, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, विशाल मोरे, माजी सरपंच रत्नमाला करंडे, कांतिलाल काळोखे, अभिमन्यू काळोखे उपस्थित होते. देहूची लोकसंख्या पन्नास हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनास दैनंदिन कारभार पाहण्यासाठी शक्य नसल्याने देहूतील नागरी हक्क जनजागृती सामाजिक मंचच्या वतीने 2012 या वर्षी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यासाठी मागणी केली. मंचच्या वतीने 2015 पर्यंत पाठपुरावा केला. मात्र, सरकारने दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थ संजय मोरे, माऊली काळोखे यांनी हायकोर्टात केस दाखल केली. त्या अनुषंगाने अधिसूचना, हरकती, पीएमआरडीचा अहवाल सरकारने मागवला. त्यानुसार आमदार शेळके यांच्याकडेही ग्रामस्थांनी नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी पाठपुरावा केला. शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देहूचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याचे जाहीर केले. तहसीलदार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या बाबत मंचचे अध्यक्ष प्रकाश काळोखे म्हणाले, "देहू पिंपरी-चिंचवड महापालिकेत घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, देहूचे तीर्थक्षेत्र म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी मंच आणि ग्रामस्थांनी महापालिकेला विरोध केला. ग्रामपंचायत कामकाज पाहण्यास मर्यादा होत्या. या पार्श्वभूमीवर मंचने नगरपंचायतीची मागणी केली.''