Chakan Crime : अल्पवयीन गुन्हेगारीचा ट्रेंड चाकण, महाळुंगे परिसरात वाढतोय

चाकण व परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार पाहिले तर त्यात सहभागी असणारी मुले ही अल्पवयीन विधी संघर्षित बालके आहेत.
crime news
crime newsesakal

चाकण - चाकण व परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार पाहिले तर त्यात सहभागी असणारी मुले ही अल्पवयीन विधी संघर्षित बालके आहेत. अल्पवयीन मुलांनी चाकण परिसरात यापूर्वी सहा खून केलेले आहेत. अल्पवयीन तरुणांकडून चाकण परिसरात किल्ल्यातील खून, मेदनकरवाडी बालाजी नगर येथील खून, पीडब्ल्यूडीच्या जागेतील खून, रोहकल फाटा येथील खून या सर्व गुन्ह्यातील आरोपी हे अल्पवयीन मुलेच होती.

त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहत तसेच परिसरातील खून हे अल्पवयीन मुलेच करताहेत हे उघड होत आहे. चाकण परिसरातील गुन्हेगारीचा ट्रेंड हा अल्पवयीन मुलांचाच आहे हे भयानक वास्तव आहे. यामुळे गुन्हेगारी वाढतेय का हा सवाल निर्माण होत आहे.

अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. अल्पवयीन मुले बहुतांश प्रमाणात गांजाचे सेवन करतात व काही हस्तकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गांजा ही विकतात त्यांची साखळी निर्माण झालेली आहे.असे चित्र चाकण व महाळुंगे परिसरात पाहावयास मिळते आहे.

चाकण, ता. खेड येथील औद्योगिक वसाहत, महाळुंगे परिसरात व चाकण परिसरामध्ये बकालीकरण सध्या वाढले आहे. देशातून येथे कामगार वर्ग राहण्यास आला आहे. परिसराचे सध्या निमशहरीकरण झाले आहे. 'इझी मनी' मिळविण्यासाठी जो, तो धडपड करू लागला आहे. अल्पवयीन मुले शाळा, कॉलेजात न जाता एकत्र गट करून, फ्रेंड सर्कल करून, ग्रुप करून वावरत आहेत.

सोशल मीडियावर ही मुले ऍक्टिव्ह आहेत. कधी शाळा,कॉलेजच्या बाहेर बसून टुकारपणे बाईक फिरवत आहेत. मुलांचा वेगवेगळा फंडा येथे चालतो आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या येथे निर्माण होत आहेत. त्यांना पोसणारे काही तरुण, गॉडफादर आहेत. सोशल मीडियावर अनेक ग्रुप व्हाट्सअप वर कार्यरत आहेत. त्यातून वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत.

फेसबुक वरही ग्रुपच्या माध्यमातून ही मुले सक्रिय असतात. औद्योगिक वसाहतीत अगदी ठेकेदारी मिळविण्यासाठी ही अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. अल्पवयीन मुलांना अटक केली जात नसल्याने खुनाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले सातत्याने सहभागी असतात. चौदा, पंधरा ते अठरा वर्षाच्या आतील मुले यामध्ये विशेष सहभाग घेतात.

या मुलांना अटक केली जात नसल्याने तसेच थोडी समज देऊन चौकशी करून त्यांच्या आई-वडिलांकडे, कुटुंबाकडे त्यांना सुपूर्द केले जाते. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चौदा ते अठरा वर्ष आतील मुले विनयभंग, चोरी, लुटमार, बेकायदा शस्त्र बाळगणे, हाणामारी करणे, चाकू हल्ला करणे यामध्ये त्यांचा सहभाग वाढतो आहे.

अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संस्कारांचा अभाव, वाईट संगतीमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी तसेच इझी मनी मिळविण्यासाठी अल्पवयीन मुले चोरी करतात तसेच हाणामाऱ्या खुनाचे प्रकार करत आहेत. काही अल्पवयीन मुले, ग्रुप अगदी खुनाच्या सुपारी घेतात.

अल्पवयीन मुलांना एखाद्या खून प्रकरणी किंवा इतर प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा अल्पवयीन मुलांना खुन आदी गुन्हा केल्यानंतर बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. अठरा वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले आहे.

अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षण गृहात पाठवले जाते, ठेवले जाते. पालकांच्या संमतीने किंवा चांगल्या वागणुकीच्या हमीवर त्यांना सोडून दिले जाते. काही होत नाही अशी भावना मुलांच्या मनात होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे.

जमिनावर सुटलेले गुन्हेगार 'गॉडफादर'

अल्पवयीन मुले गुन्हेगारी करतात त्यांना खून प्रकरणातून तसेच इतर प्रकरणातून बाहेर आलेले जामीनावर आलेले गुन्हेगार त्यांना मदत करतात. त्यांच्या टोळ्या तयार करतात व त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करून घेतात हे प्रकार चाकण परिसरात सातत्याने घडत आहेत. जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारावर पोलिसांचा वचक नाही अशीही लोकांची मागणी आहे. हे सराईत गुन्हेगार परिसरातील अल्पवयीन मुलांना गोळा करतात.

त्यांच्याकडून गुन्हेगारी करून घेतात. खंडणी,हप्ता मागणे,धमकी देणे, अगदी तरुणी, महिला यांच्या छेडाछेडीचे प्रकारही करतात.असे प्रकार सातत्याने जामिनावर सुटलेले गुन्हेगार करतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर सुद्धा पोलिसांनी लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य त्या कारवाया केल्या पाहिजेत.अशी नागरिकांची मागणी आहे.

याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे खरे आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे. चाकण औद्योगिक वसाहत तसेच परिसरात जे खून होतात त्या खुनामध्ये बहुतांश आरोपी हे अल्पवयीन मुले आहेत.

मुलांना अटक केली जात नसल्याने तसेच त्यांना चौकशी करून त्यांच्या आई, वडिलांकडे, कुटुंबाकडे सुपूर्द केले जात असल्याने ते सातत्याने गुन्हे करतात.गुन्ह्यावर वचक येण्यासाठी अल्पवयीन मुलांना गुन्ह्यापासून प्रवृत्त करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचे पोलिसांच्या वतीने काम सुरू आहे. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांच्या वतीने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्या मुलांना संस्कार क्षम बनविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

हा फायदा अल्पवयीन मुलांना होऊन गुन्हेगारी आपोआप कमी होईल. चाकण परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांची यादी बनविली आहे. संबंधित गुन्हेगारावर योग्य त्या कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांना या गुन्हेगारापासून काही त्रास होत असेल तर त्यांनी चाकण पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा. पोलीस योग्य ती कारवाई करतील व नाव गोपनीय ठेवले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com