वाढीव मालमत्ताकराविरोधात बाराशे हरकती

वाढीव मालमत्ताकराविरोधात बाराशे हरकती

तळेगाव दाभाडे, ता.११ ः वार्षिक चतुर्थ श्रेणी मालमत्ता कर आकारणीला तळेगाव दाभाडेवासीयांनी तीव्र विरोध दर्शवला असून पहिल्या दिवशी सुमारे १ हजार २०० नागरिकांनी हरकती नोंदविल्या. त्यातील काही हरकती थेट नगर परिषदेकडे आल्या आहेत. तर काही हरकती आमदार सुनील शेळके यांच्यामार्फत नगर परिषदेकडे पोहोचविण्यात आल्या आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्यावतीने, वाढीव मालमत्ता कर आकारणी केली जात असून त्याला आमदार शेळके यांच्यासह नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नागरिकांकडून त्याबाबतच्या हरकती स्वीकारण्यासाठी शेळके यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली असून १९ तारखेपर्यंत त्या स्वीकारल्या जाणार आहेत. नगर परिषदेच्या बाहेर स्वतंत्र मंडप उभारण्यात आला असून १० ते ११ कार्यकर्त्यांची हरकती स्वीकारण्यासाठी नेमणूकही करण्यात आली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या हरकती नोंदवता येणार आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील बहुतांशी विकास कामे ही स्थानिक मालमत्ता करातून केली जात नाहीत. राज्य शासनाच्या विविध योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून ही कामे सुरू आहेत. त्यामुळे, नगर परिषदेने प्रस्तावित मालमत्ता कर वाढ नेमकी कुणासाठी केली ? असा सवाल आमदार शेळके यांनी केला असून सदनिका भाड्याने दिलेली नसतानाही भाडेतत्वानुसार कर आकारणारे तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन हे एकमेव असावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
वार्षिक चतुर्थ श्रेणी मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसांविरोधात जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात. नागपूर खंडपीठाच्या आदेशाला अनुसरून नगर परिषदेच्या प्रस्तावित करवाढीस स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तोपर्यंत कुणीही कर भरू नये, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले होते.

नगर परिषदेकडे ५०० हरकतींची नोंद
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकूण ३८ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी सुमारे २६ हजार मालमत्तांसाठी वाढीव कराबाबत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. उर्वरित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी, आतापर्यंत नगर परिषदेकडे नागरिकांनी ५०० हरकती नोंदविल्या आहेत.

मालमत्ताकराबाबत हरकती किरकोळ असतील; तर त्यावर नगर परिषदेत दुरूस्ती केली जाईल. मात्र, त्या मोठ्या स्वरूपात असतील; तर त्या नगर रचना विभागाकडे पाठवाव्या लागतील. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नगर रचना विभागाचे अधिकारी व मालमत्ताधारकांची बैठक घेण्यात येईल.
- कल्याणी लाडे, कर अधिकारी, नगर परिषद, तळेगाव दाभाडे
PNE24U25395

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com