
व्यावसायिकांना पुढील तारखेचा धनादेश देऊन माल घ्यायचा, बंद असलेली कंपनी आपलीच असल्याचे खोटे सांगून हा माल बंद कंपनीसमोर खाली करायचा. त्यानंतर तो माल त्याठिकाणाहून दुसरीकडे नेऊन विकायचा.
पिंपरी : व्यावसायिकांना पुढील तारखेचा धनादेश देऊन माल घ्यायचा, बंद असलेली कंपनी आपलीच असल्याचे खोटे सांगून हा माल बंद कंपनीसमोर खाली करायचा. त्यानंतर तो माल त्याठिकाणाहून दुसरीकडे नेऊन विकायचा. दरम्यान, ज्या व्यावसायिकांकडून माल घेतला आहे. त्यांना पैसे न देता पसार व्हायचे. अशाप्रकारे व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना गजाआड करण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून 38 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दीपक किशोरीलाल गुजराल (वय 32, रा. आदिनाथनगर, भोसरी), विजयकुमार हरिराम विश्वकर्मा (वय 45, रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चार जणांच्या टोळक्याने भोसरीतील परशुराम भोसुरे या व्यावसायिकाकडून 64 टन 880 किलो वजनाचे स्टील घेऊन त्यांची 38 लाख 15 हजार 211 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी गुजराल व विश्वकर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता हा गुन्हा त्यांच्या टोळीचा म्होरक्या हरिष राजपूत व सागर पारेख यांच्यासह केल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपींकडून पोलिसांनी 38 लाख 15 हजार 211 रुपयांचे 64 टन 880 किलो वजनाचे स्टील जप्त केले.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ही कारवाई भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी अजय डगळे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, सागर जाधव, गणेश हिंगे, समीर रासकर, संतोष महाडिक, सुमीत देवकर यांच्या पथकाने केली.
...असे करायचे फसवणूक
हरिष राजपूत व सागर पारेख हे इंडिया मार्ट या वेबसाईटवरून स्टील व्यावसायिकांशी संपर्क साधत. विजय विश्वकर्मा याच्या नावे असलेल्या विश्वकर्मा ब्रदर्स या फर्मचे नाव व कागदपत्रे वापरून व पुढील तारखेचा धनादेश देऊन स्टील खरेदी करत. ते स्टील बंद असलेली कंपनी त्यांच्या मालकीची आहे, असे सांगून त्या कंपनीसमोर तो माल खाली करून घेत. व त्यानंतर तो माल त्याठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाऊन विकत असत. दरम्यान, ज्या व्यावसायिकांकडून स्टील घेतले आहे. त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करीत असत. या आरोपींवर छत्तीसगड, मध्यप्रदेश व तेलंगणा येथे प्रत्येकी एक तर मुंबईत दोन गुन्हे दाखल आहेत.