दैव बलवत्तर म्हणून 'ते' वाचले; पण लोक व्हिडिओ, फोटोच्या नादात माणुसकी विसरले!

दैव बलवत्तर म्हणून 'ते' वाचले; पण लोक व्हिडिओ, फोटोच्या नादात माणुसकी विसरले!

पिंपरी : दुपारची वेळ, भरधाव मोटारीच्या धडकेमुळे रिक्षातील दाम्पत्य अक्षरश: बाहेर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने दोघेही बेशुद्ध पडले. तातडीने रुग्णालयात हलविण्याची आवश्‍यकता होती. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही लवकर पुढे येईना. जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असलेले दोघेही रस्त्यावर पडून होते. यावेळी काहीजण मदत करण्याऐवजी फोटो, व्हिडिओ काढण्यात दंग होते. हे फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात जी तत्परता दाखविली, ती मदत करण्यात दाखविली नाही. काहींनी तर सोशल मीडियावरून अफवा पसरवून जखमींना थेट यमसदनी धाडलं. दैव बलवत्तर म्हणून दोघेही या अपघातातून बचावले. मात्र, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच माणुसकी व संवेदनशीलताही हरविली असल्याचे दिसून आले. 

पिंपरी-चिंचवड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (ता. 24) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटार व तीन चाकी टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये सुमन दौंडकर (वय 40) व मनोहर साधू दौंडकर (वय 45, दोघेही रा. चिंचवड) हे गंभीर जखमी झाले. दौंडकर दाम्पत्य तीन चाकी टेम्पोतून नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येत होते. तर (एमएच 12, क्‍युडब्ल्यू 7819) या क्रमांकाची मोटार नाशिक फाट्याकडून पिंपरी चौकाकडे येत होती. या दोन्ही वाहनांची पिंपरी चौकात जोरात धडक झाली. या अपघातात टेम्पोतील दौंडकर दाम्पत्य टेम्पोतून बाहेर फेकले गेले. ही धडक इतकी जोरात होती की धडकल्यानंतर हा टेम्पो मागील दोन चाकांवर अक्षरश: उभा राहिला. तसेच मोटारही चौकातील दुभाजकावर धडकली. धडक झाल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाल्याने बेशुद्ध झाले. काही वेळातच अपघातस्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेहमीच सभा, मोर्चा, आंदोलन यासह राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या पिंपरी चौकात घडलेल्या या अपघाताची खबर काही क्षणातच शहरभर पसरली. अपघाताचे फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले. 'भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू', 'अपघातात दोघांचा जागीच मृत्यू', अशा प्रकारची अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल झाले. यासह सायंकाळी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुणीही पुढे सरसावत नव्हता. दोघेही भरउन्हात रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडून होते. 'मोठा अपघात झालाय, किती लोकं गेलीत' केवळ अशीच चर्चा सुरू होती. अखेर खूप वेळानंतर एक ऑटो रिक्षा आल्यानंतर त्यामधून जखमींना पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या भीतीमुळे कुणी मदतीसाठीही पुढे येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात डॉक्‍टरांकडून जखमींवर उपचार सुरू असतानाही सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज व्हायरल होत राहिले. मात्र, येथे 'देव तारी, त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय येथे आला. जर दैव प्रबळ असेल व आयुष्याची दोरी बळकट असेल तर तुम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही, हे येथे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर काहीही मेसेज व्हायरल होत असले, तरी डॉक्‍टरांचे प्रयत्न व जखमींच्या इच्छाशक्तीमुळे दोघेही मृत्यूच्या दाढेतून परतले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, या घटनेत कोरोनामुळे माणुसकी व सोशल मीडियाच्या अघोरी प्रेमापोटी नागरिकांमधील संवेदनशीलता हरवत चालल्याचे दिसून आले. 

त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली 

या अपघाताबाबतचे मेसेज जखमींच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याही पायाखालची अक्षरश: जमीनच सरकली. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर जखमींच्या प्रकृतीबाबत खरी माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांना जीव भांड्यात पडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com