शिवसेना खिळखिळी होण्यास उध्दव ठाकरेच जबाबदार - रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale

पिंपरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश महिला आघाडीच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीसाठी आले असताना रामदास आठवले बोलत होते.

शिवसेना खिळखिळी होण्यास उध्दव ठाकरेच जबाबदार - रामदास आठवले

पिंपरी - राज्यात सरकार स्थापन करताना भाजपासोबत शिवसेनेने आघाडी करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही, परिणामी शिवसेनेत बंड झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार, खासदारांना घेऊन बाहेर पडले. भाजपासोबत नवीन सरकार स्थापन केले. सध्या शिवसेना खिळखिळी झाली असून त्याला उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे सोमवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत केली.

पिंपरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश महिला आघाडीच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीसाठी आले असताना रामदास आठवले बोलत होते. या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, महिला आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा कमल कांबळे, युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल व्हवाळकर, जगदीश गायकवाड, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजित कांबळे, नागेश कांबळे, के. एम. बुक्तर, अजीज शेख आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले की, राज्यातील महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहेच. आरपीआयकडूनही गाव तिथे शाखा ही मोहिम सुरू करून महिलांवरील अन्यायाला वाचा फोडू. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.

मुंबई महापालिका शिवसेनेकडून हिसकावून घेवू - आठवले

मुंबई महापालिका भाजप व आम्हाला जिंकणे आव्हानात्मक आहे. परंतु; आम्ही सगळे एकत्र येवून ती शिवसेनेकडून हिसकावून घेवू. राज्यातील उद्योग महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे बाहेर गेले. हे उद्योग बाहेर न जाता इथेच राहतील यासाठी शिंदे-फडणवीस सरकार ताकद लावतील, असे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. त्यामध्ये आरपीआयला एक मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध समित्या, महामंडळ यावर देखील आरपीआयला जागा द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, तसेच; पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाकडे ३९ जागांचा आग्रह धरला असून २५ जागांवर लढू.

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.