‘व्हॅलेंटाइन डे’साठी जवळ आला; मात्र, गुलाबाचा तुटवडा होणार निर्माण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून गुलाबाची फुले निर्यातीला सुरुवात झाली असली, तरी यंदा गायब झालेल्या थंडीमुळे लवकर सुरू झालेले उत्पादन, युरोपमध्ये असलेले कोरोनाचे संकट, वाहतूक खर्चात झालेली तिप्पट वाढ आदी आव्हानांना फूल उत्पादकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदा या व्यवसायातील उलाढालीवर अनिश्‍चिततेचे सावट आहे.

वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून गुलाबाची फुले निर्यातीला सुरुवात झाली असली, तरी यंदा गायब झालेल्या थंडीमुळे लवकर सुरू झालेले उत्पादन, युरोपमध्ये असलेले कोरोनाचे संकट, वाहतूक खर्चात झालेली तिप्पट वाढ आदी आव्हानांना फूल उत्पादकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदा या व्यवसायातील उलाढालीवर अनिश्‍चिततेचे सावट आहे. स्थानिक बाजारपेठेत मात्र, फुलांचा तुटवडा निर्माण होणार असल्याने विक्रमी दर मिळण्याची शक्‍यता आहे. 

मावळ तालुक्‍यात सुमारे तीनशे एकर क्षेत्रावर हरितगृहातील गुलाबशेती केली जाते. विविध कार्पोरेट कंपन्यांसह सुमारे अडीचशे शेतकरी फुलांची शेती करत आहेत. तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमध्ये सुमारे दीडशे एकर क्षेत्रावर सुमारे शंभर व्यावसायिक फुलशेती करीत आहेत. फूल उत्पादक कंपन्या व शेतकऱ्यांसाठी व्हॅलेंटाइन डे हा सुगीचा कालावधी मानला जातो. या कालावधीत गुलाब फुलांना सर्वाधिक मागणी व सर्वाधिक भाव मिळतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे त्यांच्या वर्षभरातील व्यवसायाच्या उलाढालीतील पन्नास ते साठ टक्के उलाढाल याच कालावधीत होते. यंदा मात्र या उलाढालीवर अनिश्‍चिततेचे सावट आहे. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाइन डे झाल्यानंतर कोरोनाचे संकट सुरू झाले. विवाहसोहळे, सण-समारंभावर लॉकडाउनमुळे निर्बंध आल्याने व्यवसाय ठप्प झाला. ३ जूनला झालेल्या चक्री वादळात या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून उभारी घेत त्यांनी व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली. अनलॉकची प्रक्रिया सुुरू झाल्यानंतर हळूहळू या व्यवसायात पुन्हा बरकत सुरू झाली. व्हॅलेंटाइन डेसाठी सुमारे ५० दिवस आधी उत्पादनाचे नियोजन करावे लागते. युरोपात कोरोनाचे संकट कायम राहिल्याने सुमारे ४० ते ५० टक्के उत्पादकांनी धोका न पत्करला निर्यातीसाठी उत्पादनाचे नियोजन केले नाही व नियमित उत्पादन सुरू ठेवले.

बापरे! लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल एवढी अवैध बांधकामे झाली

व्यवसायावर अनिश्‍चिततेचे सावट
व्हॅलेंटाइन डेसाठी सुमारे पन्नास टक्के उत्पादकांनी नियोजन केले. परंतु, गायब झालेली थंडी व उष्ण हवामानामुळे त्यांचे नियोजन विस्कळित झाले आहे. उष्ण हवामानामुळे निर्यातीला सुरुवात होण्याच्या आठ दिवसआधीच फुले उमलण्यास सुरुवात झाली. युरोपातील कोरोना संकट लक्षात घेऊन कोणत्याही ट्रेडर्सने यंदा फुलांचे आगाऊ बुकिंग केले नाही. २७ जानेवारीनंतर सोएक्‍स फ्लोरा व ओरिएन्टल या कंपन्यांनी निर्यातीसाठी शेतकऱ्यांकडून फुले घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, युरोपातील लॉकडाउनमुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे किती प्रमाणात साजरा होईल व त्यासाठी किती फुले निर्यात होतील व दर किती मिळेल याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. फुले निर्यातीसाठी कार्गोची व्यवस्था नाही. त्यामुळे फुले प्रवासी विमानातूनच पाठवावी लागतात. प्रवासी विमानांची संख्या कमी असल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत. पूर्वी एका किलोला दीडशे रुपये खर्च येत होता. तो आता साडेचारशे रुपये एवढा झाला आहे. वाढीव खर्चाचा भुर्दंड फूल उत्पादकांवरच पडणार आहे. त्यामुळे यंदा निर्यातीतून किती प्रमाणात उलाढाल होईल याबाबत फूल उत्पादकांमध्ये साशंकता आहे. 

स्थानिक बाजारपेठेत वाढणार मागणी
१४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन डेसाठी ९ फेब्रुवारीपर्यंत फुलांची निर्यात केली जाईल. त्यानंतर पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता, जयपूर, पाटणा, रांची, चंडीगड, अहमदाबाद, अलाहाबाद, लखनौ, हैदराबाद या शहरांसह स्थानिक बाजारपेठेत फुले पाठवली जातील. परंतु, यंदा उत्पादनाला लवकर सुरुवात झाल्याने स्थानिक बाजारपेठेसाठी मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकणार नाही. आता अनलॉक झाल्याने व्हॅलेंटाइन डे साजरा होईल. ज्यांची फुले स्थानिक बाजारात जातील त्यांना विक्रमी दर मिळेल. 

यंदा प्रतिकूल हवामानामुळे मावळ तालुक्‍यातील फूल उत्पादकांचे उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच युरोपातील कोरोना संकटामुळे फुले निर्यात होतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, आता फुले निर्यातीला सुरुवात झाली आहे. दराबाबत अद्याप हमी मिळाली नसली, तरी फुले जातात ही उत्पादकांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. 
- शिवाजी भेगडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ.
                               
कोरोना व प्रतिकूल हवामानामुळे यंदा व्हॅलेंटाइन डेच्या उलाढालीवर अनिश्‍चिततेचे सावट आहे. उष्ण हवामानामुळे उत्पादनाला लवकर सुरुवात झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेसाठी फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत फुलांना अधिक भाव मिळेल.  
- मल्हार ढोले, सचिव, तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentines Day Shortage of Roses