RTE Admission Process : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

  • 23 ऑक्‍टोबरपर्यंत करता येणार प्रवेशनिश्‍चिती 

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांसाठी पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर अखेर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 23 ऑक्‍टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. परिणामी पालकांना दिलासा मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यावर्षी 17 मार्चला आरटीई प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन पहिली सोडत काढली. शहरातील 179 शाळांमधील तीन हजार 786 जागांसाठी 13 हजार 913 अर्ज आले होते. पहिल्या सोडतीत तीन हजार 786 विद्यार्थ्यांची निवड झाली. कोरोनाकाळात दोन मुदतवाढीनंतर दोन हजार 304 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. निवड झालेल्यापैकी एक हजार 447 विद्यार्थ्यांनी अद्याप शाळांशी संपर्क केला नाही. त्यानंतर आता रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना 'एसएमएस'द्वारे प्रवेशाची तारीख कळविण्यात येत आहे. परंतु, पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवर विद्यार्थी अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पाहावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. 

शाळेत गर्दी न करण्याच्या सूचना 

प्रवेशासाठी शाळेत गर्दी करू नये. प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये. कागदपत्रांच्या मूळ, छायांकित प्रती सोबत असाव्यात. हमीपत्र, अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत न्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना केल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकडे बोलतात 

उन्नत केंद्र/शाळा/विद्यार्थी निवड/प्रवेश निश्‍चित/अर्ज बाद/पालकांचा संपर्क नाही/रिक्त जागा 

आकुर्डी/112/2253/1454/20/780/733 

पिंपरी/67/1533/851/15/667/500


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for students on the waiting list is over, RTE Admission Process