Automatic Smart Signal System : वाहनांनुसार आपोआप ठरतेय सिग्नलची वेळ

गेल्या अनेक वर्षांपासून वाकड-हिंजवडीतील वाहतूक समस्या काही केल्या सुटत नाही. मात्र, याच हिंजवडीतील सॉफ्टवेअर अभियंत्याने वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय शोधला आहे.
Wakad Signal
Wakad Signalsakal

- बेलाजी पात्रे

वाकड - गेल्या अनेक वर्षांपासून वाकड-हिंजवडीतील वाहतूक समस्या काही केल्या सुटत नाही. मात्र, याच हिंजवडीतील सॉफ्टवेअर अभियंत्याने वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय शोधला आहे. त्याने तयार केलेल्या स्मार्ट सिग्नलमुळे पोलिसांविना आपोआप वाहतूक नियमन होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटत आहे.

रावेत येथे राहणाऱ्या प्रशांत गिलबिले या संगणक अभियंता तरुणाने हा स्मार्ट सिग्नल बनवला आहे. वाकड वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर गेल्या महिन्यात सर्वात आधी वाकड गावठाण चौकात पहिला स्वयंचलित स्मार्ट सिग्नल बसविला. तिथे प्रयोग यशस्वी झाल्याने आता हे सिग्नल विनोदे नगर चौकात बसविण्यात आले आहेत. या सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सेन्सर असल्याने वाहनांच्या गर्दीवर सिग्नलचा वेळ निर्धारित होतो. ज्या मार्गावर वाहने जास्त, तिकडचा सिग्नल आपोआप आणि जास्त वेळ सुरू राहतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून आयटीयन्ससह रहिवाशांची काही प्रमाणात सुटका झाल्याचे चित्र आहे.

गिलबिले व त्यांच्या सोळा जणांच्या टीमने वर्षभर मेहनत घेऊन, हे स्मार्ट सिग्नल साकारले आहेत. सध्या वाकडमध्ये या सिग्नलची ट्रायल यशस्वी होत आहे. या स्मार्ट सिग्नलमुळे वाहतूक नियमन करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळातही कमालीची कपात होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण शहरातील चौका-चौकात वाहतूक पोलिस व वार्डनशिवाय केवळ स्मार्ट सिग्नल दिसल्यास नवल वाटायला नको.

अशी सुचली कल्पना

आयटी पार्क हिंजवडीत नोकरी करणारे अभियंता प्रशांत गिलबिले यांना कामावरून घरी जाताना अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असे. त्यानंतर त्यांनी स्मार्ट सिग्नलवर काम करण्याचे ठरवले. सोळा जणांची टीम घेऊन, वर्षभर प्रयोग केल्यानंतर त्यांना त्यात यश आले. त्यांनी या प्रकल्पाचे पेटंट मिळवले असून, शहरभरात सिग्नल बसवण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. आधी पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनानुसार वाकड चौकात सिग्नल बसवण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे लक्षात येताच सहआयुक्त संजय शिंदे यांच्या सूचनेनुसार हिंजवडीकडे जाणाऱ्या विनोदेनगर चौकात सिग्नल बसवला आहे.

Wakad Signal
Pimpri Firing : चिखलीत भरदिवसा गोळीबारात तरुणाचा खून

असे काम करतात स्मार्ट सिग्नल

  • सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरा सेन्सर आहे.

  • वाहनांच्या गर्दीवर सिग्नलची वेळ बदलते.

  • गाड्यांची संख्या कॅप्चर करून, वेळ बदलला जातो.

  • सिग्नलवर एकही गाडी नसल्यास सिग्नल पडतच नाही.

  • रुग्णवाहिका, सायरन अथवा दिव्याची गाडी आल्यास सिग्नल हिरवा होतो व ते वाहन गेल्यास पुन्हा पूर्ववत होतो.

  • चौकात चहूबाजूने गर्दी झाल्यास गाड्यांचा सरासरी वेळ लक्षात घेऊन सिग्नल बदलतो.

  • ग्रीन कॉरिडॉर किंवा व्हीआयपी मूव्हमेंटला सिग्नल आपोआप सेट होतो.

  • अपघात किंवा एखादी दुर्घटना, नियम मोडणाऱ्या वाहनांची माहिती जाहीर करते.

वाकड-हिंजवडीची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवण्यात येत आहे. स्मार्ट सिग्नलची चाचणीदेखील यशस्वी होत असून, भविष्यात संपूर्ण वाकडमधील रस्त्यांवर अन त्यानंतर शहरभर स्मार्ट सिग्नलचा प्रयोग राबविण्याचे संकेत वरिष्ठांनी दिले आहेत.

- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वाकड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com