वाकडमधील रस्त्यांचे विषय फेटाळले; सत्ताधारी भाजपने बदलली भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

  • स्थायी समितीने दोन्ही विषय फेटाळले
  • गेल्या आठवड्यातील भूमिका बदलली 

पिंपरी : वाकड-ताथवडे प्रभाग क्रमांक 25 मधील चार नवीन रस्त्यांच्या कामांचे विषय मंजूर करण्यावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत गेल्या आठवड्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट पडले होते. मात्र, या आठवड्यातील सभेत त्याच रस्त्यांच्या मुद्यांवर दोन्ही गटांचे एकमत झाल्याने दोन विषय फेटाळून लागले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्थायी समिती सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. वाकड-ताथवडे प्रभागातील शाळेचा रस्ता, शनिमंदिर ते मारुंजी रस्ता, मुंबई-पुणे महामार्ग व जीवननगर (गाडा) रस्ता आणि भुजबळ चौक उड्डाणपूल ते काळाखडक रस्ता असे चार विषय आयुक्तांनी मांडले होते. ते मंजूर करण्याची भूमिका शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी गेल्या आठवड्यातील सभेत घेतली होती. तर आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांनी प्रस्ताव फेटाळून लावण्याची मागणी केली होती. अखेर पहिल्या दोन विषयांवर मतदान घेण्यात आले. त्यात आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेची बाजू घेऊन मतदान केले होते. त्यामुळे आठ विरुद्ध पाच मतांनी विषय मंजूर झाला होता. तर, अन्य दोन रस्त्यांचे विषय तहकूब ठेवले होते. ते या आठवड्यातील सभेत पुन्हा मांडण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगताप समर्थकांनी विषय फेटाळून लावण्याचा आग्रह धरला. शिवसेनेची भूमिका विषय मंजूर करावा, अशी होती. त्यामुळे या विषयांवर मतदान घेण्यात आले. त्यात लांडगे समर्थकांनी जगताप समर्थकांची बाजू घेत मतदान केल्याने एक रस्ता नऊ विरुद्ध पाच मतांनी व दुसरा रस्ता दहा विरुद्ध पाच मतांनी फेटाळण्यात आला. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार 
वाकड-ताथवडेतील रस्त्यांचा प्रस्ताव आयुक्तांचा आहे. नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांची कामे होणे, गरजेचे आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी राजकीय आकसापोटी दोन रस्त्यांचे विषय फेटाळून लावले आहेत. या बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wakad road subject rejected in pimpri chinchwad municipal corporation standing committe