मुळशी, पवनाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांचा चुकतोय काळजाचा ठोका

रमेश मोरे
Sunday, 30 August 2020

गेल्या आठवडाभरापासून धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात वरूणराजा चांगला बरसतोय. त्यामुळं मुळा व पवनेच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीकरांना एकीकडं धरणं भरल्याचा आनंद, तर दुसरीकडं पुराच्या पाण्याची काळजी सतावतेय.

जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : गेल्या आठवडाभरापासून धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात वरूणराजा चांगला बरसतोय. त्यामुळं मुळा व पवनेच्या कुशीत संगमावर वसलेल्या जुनी सांगवीकरांना एकीकडं धरणं भरल्याचा आनंद, तर दुसरीकडं पुराच्या पाण्याची काळजी सतावतेय. पाऊस असाच पडत राहिल्यास दोन्ही धरणांतून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जुनी सांगवीतील नदीकिनारा भागातील रहिवाशांना पुराच्या पाण्यासाठी खबरदारी घ्यावी लागणाराय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गतवर्षी तीन ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळं पवना व मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग केला होता. त्यातच संततधार पावसामुळं जुनी सांगवीचा नदीकिनारा परिसर हा चार फूटापर्यंत उंच पाणी आल्याने एखाद्या बेटाप्रमाणे जलमय झाला होता. या पुराच्या पाण्याची झळ बसून अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य गमवाव्या लागल्या.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील मुळा नदीकिनारा भागातील मुळानगर झोपडपट्टी पाण्याखाली गेली होती. तर मधुबन सोसायटी, जयमालानगर, पवनानगर, संगमनगर, ममतानगर या मोठ्या रहिवासी भागाला पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. यावर्षी पवना धरण उशिरा भरल्यानं त्यामधून रविवारी (ता. ३०) पाणी सोडल्यानं एकीकडं धरणं भरल्याचा आनंद, तर दुसरीकडं पुन्हा गतवर्षाची पुनरावृत्ती होणार नाही ना, अशी काळजी नागरिकांना सतावतेय. गतवर्षी मुळानगर झोपडपट्टी जलमय झाली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यंदा मुळशी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शनिवारी (ता. २९) धरणातून जवळपास दहा हजार पाचशे क्यूसेकचा विसर्ग मुळा नदीपात्रात सुरू होता. तर रविवारी पवना धरण भरल्यानं सकाळी धरणातून तीन हजार क्यूसेक पाणी सोडल्याने नदीकिनाराभागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. याबाबत सोशल मीडियावर कालपासून मॅसेज व्हायरल होतायेत. त्यामुळं नदीकिनारा भागातील नागरिकांनी काळजी वाढत आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांसाठी उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न विचारला जातोय.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water discharge from mulshi and pavna dam then old sangavi's citizens worried