भोसरीतील साई सिद्धनगरमधील रहिवाशांचा पाणी प्रश्‍न अखेर सुटला

संजय बेंडे
Friday, 1 January 2021

  • सोळा वर्षांपासूनच्या समस्येतून २५ कुटुंबांची सुटका; नगरसेविकेचे प्रयत्न

भोसरी (पिंपरी-चिंचवड) : ‘‘आमच्या साई सिद्धनगर भागात गेल्या सोळा वर्षांपासून पाणी मिळत नव्हते. महापालिकेच्या नळावर केवळ दोन-तीन हंडेच पाणी मिळायचे. मंदा जढर यांच्या बोअरमधून वापरण्यासाठीचे पाणी घेत होतो. नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आमची अडचण ओळखून स्वतःच्या जागेतून पाण्याची पाइपलाइन टाकली. त्यामुळे आमच्या पाण्याची समस्या सुटणार असल्याने आनंद होत आहे,’’ असे स्थानिक रहिवासी शीला पिल्ले सांगत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गवळीनगर प्रभागात दिघी रस्त्यावरील आदर्श शाळेच्या पाठीमागील साई सिद्धनगरचा काही भाग उंचावर आहे. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठीची पाइपलाइन दिघी रस्ता-तुकाई मंदिर-साई सिद्धनगर अशी यू-टर्न मार्गाने टाकली होती. पाणी सुटण्याच्या वेळी उताराकडील भागातील नागरिकांना मुबलक व अधिक दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यात काही रहिवासी पाण्याच्या मोटारीचा उपयोग करतात. त्यामुळे साई सिद्धनगरच्या उंचावरील भागात पाणी पोचत नव्हते. सर्वांचे पाणी भरून झाल्यावर त्यांनी नळ, मोटारी बंद केल्यावर या भागात कमी दाबाने पाणी येत होते. परिणामी २५ कुटुंबांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. गेल्या १६ वर्षांपासून ही समस्या होती. नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका बारसे या पाठपुरावा करत होत्या. मात्र, या भागात पाइपलाइन टाकण्यासाठीची योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे बारसे यांनी स्वतःच्या आदर्श शाळेच्या सिमाभिंतीच्या आतून सुमारे ७५ फूट लांबीच्या पाइपलाइनसाठी जागा दिल्याने येथील नागरिकांची पाण्याची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याविषयी येथील नागरिक गीता पवार म्हणाल्या, ‘‘पिण्याचे पाणी जेमतेमच मिळत असल्याने पाणी जपून वापरावे लागत होते. महापालिकेने दिवसाआड पाणी सुरू केल्याने आमच्या समस्या अधिक वाढल्या होत्या. मात्र, सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे मुबलक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.’’ 

आमच्या घरी असलेल्या बोअरमुळे येथील बऱ्याच कुटुंबांना वापरावयाचे पाणी मिळत होते. मात्र, पिण्याच्या पाण्याची आबाळ होत होती. कधी-कधी तर एक-दोन हंडेच पाणी मिळत होते. त्यामुळे इतर सोसायट्यांमधून पाणी आणावे लागत होते.
- मंदा जढर, स्थानिक रहिवासी, साई सिद्धनगर

रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्याच वर्षी नवीन पाइपलाइन टाकली होती. मात्र, ती यु-टर्न मार्गाने साई सिद्धनगरमध्ये जात होती. त्यामुळे या भागात कमी दाबाने पाणी येत होते. शिवाय पाइपलाइन टाकण्यासाठी इतर ठिकाणची जागा उपलब्ध होत नसल्याने स्वतःच्या आदर्श शाळेतून पाइपलाइन टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ती सरळ साई सिद्धनगरला जाणार असल्याने रहिवाशांचा पाणी प्रश्‍न सुटेल.
- प्रियांका बारसे, नगरसेविका

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water issued solved in residents of sai siddhanagar in bhosari