80 व्या वर्षी आजोबांची कमाल;टाकाऊ वस्तूंपासून बनवलं वॉटर सेव्हर

sharad-deshpande
sharad-deshpande

पिंपरी - वस्तू अडगळीत पडली की, कधी एकदा घराबाहेर टाकून देईन, अशी लोकांची मानसिकता असते. मात्र, याला आकुर्डीतील तंत्रस्नेही आजोबा अपवाद ठरले आहेत. वयाच्या ऐंशीतही ते घरातील भंगारात पडलेल्या वस्तूंपासून कलाकृती साकारल्या आहेत. एवढेच नव्हे तर पाणी वाया जाऊ नये, यासाठी त्यांनी सायफन प्रिन्सिपलवर आधारित "इलेक्‍ट्रिक अँड वॉटर सेव्हर' हे अत्याधुनिक यंत्र घरातील टाकाऊ वस्तूंपासून बनविले आहे. 

आकुर्डी प्राधिकरण, गंगानगर, सेक्‍टर 28 येथे राहणारे शरद रामचंद्र देशपांडे. बीएसएनएलमधून 2000 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून स्वस्थ न बसता त्यांनी नाविन्याचा शोध घेत विविध प्रकारचे कल्पक काम केले आहे. बाजारात काही वर्षांपूर्वी दाखल झालेली एमर्जन्सी बॅटरी त्यांनी 25 वर्षापूर्वी तयार केली होती. घरातील वीजपुरवठा खंडीत झाला की, बॅटरी सुरू होते. नातवंडांनाही त्यांच्या शाळेतील विज्ञानाच्या प्रकल्पात ते मार्गदर्शन करतात. या कल्पक आजोबांमुळे मुलेही प्रकल्पात प्रवीण झाली आहेत. सध्या त्यांनी वॉटर सेव्हरचे ऍडव्हान्स व्हर्जन तयार करण्यासाठी घेतले आहे. ते ही टाकाऊ वस्तूंमधून. 

इतरही छंद जडले 
घरातील कोणतीही वस्तू भंगारात जमा न करता त्यातून ते तांत्रिक कामांबरोबरच कलात्मक वस्तू तयार करतात. कोणतेही सण समारंभ असले तरीही आकर्षक व शोभिवंत वस्तू ते बनवितात. दिवाळीसाठी लागणारे आकाश कंदिल पुठ्ठे व कागदातून साकारतात. रिकामे डब्बे, तारा, बटणे, कापड कोणतेही वस्तू वाया जाऊ देत नाहीत.

आत्तापर्यंत त्यांनी साडेतीन फुटाचा सर्वांत मोठा आकाश कंदिल बनविला आहे. तो सर्वांचा आकर्षणाचा विषय ठरला आहे. डोहाळ जेवणासाठी महिला आवर्जून फोटोशूट करतात त्यासाठी लागणाऱ्या चंद्र, चांदण्याही आजोबांनी बनविल्या. हलव्याचे दागिनेही बनविता. चाफ्याची फुले बनवून त्यात अत्तराच्या कुप्या त्यांनी बसविल्या आहेत. देशपांडे यांची बहीण शिल्पा बिबीकर म्हणाल्या, ""भावाला स्वप्नातही नवनवीन कल्पना सुचतात. पहाट उजाडली की एकटेच उठून ते धडपड करत असतात. याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत.'' 

इलेक्‍ट्रिक अँड वॉटर सेव्हरची कल्पना 
""गौरी डेकोरेशनला दरवर्षी नवनवीन विज्ञान प्रयोग करतो. एकेवर्षी कृष्ण पाळण्यात बसून झोका घेत असताना पाणी सुरू होते व बंद होते असा स्वयंचलित देखावा तयार केला. त्यातून मी पाण्याच्या मोटारचे स्वयंचलित यंत्र साकारले. घराबाहेर एक रिकामा बॉक्‍स ठेवून त्यात दोन स्वीच बसविले. पाण्याची टाकी भरण्याअगोदर पाइपने पाणी खाली येते. स्वीचने बॉक्‍सला विद्युत जोड दिला आहे. पाणी खाली आले की, बॉक्‍समधील पेल्यात पाणी पडते. वजनाने ग्लास भरतो व स्वीच ऑफ होतो. त्यामुळे वाया जाणारे पाणी त्वरीत थांबते. त्यात एक यू आकाराची ट्यूब बसविलेली आहे. त्यानंतर ग्लास रिकामा होतो. पाणीही वाया जात नाही. सर्वांत सोपे आणि कमी कालावधीत तयार होणारे हे युनिट त्यांनी तयार केले आहे. त्यामुळे विजेची बचत होते.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com