esakal | पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राच्या पंपगृहांमधील 22 केव्ही उच्चदाब वीज संच मांडणी व दुरुस्तीचे काम आज तातडीने करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी :  रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राच्या पंपगृहांमधील 22 केव्ही उच्चदाब वीज संच मांडणी व दुरुस्तीचे काम आज तातडीने करण्यात आले. त्यामुळे सकाळी अकरापासून अशुद्ध जलउपसा बंद केला होता. दुपारी सव्वाबारा वाजेपर्यंत काम पूर्ण करण्यात आले. पंपाद्वारे जलउपसा सुरू झाला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून एका तासात सरासरी 20 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. म्हणजेच मंगळवारी सव्वातास पंप हाऊस बंद राहिल्याने सुमारे 25 दशलक्ष लिटर जलउपसा होऊ शकला नाही. शिवाय, सर्व पंप सुरू करण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो. या कालावधीचा विचार करता सुमारे पाच दशलक्ष लिटर पाणी उपसा कमी होतो. याचा विचार करता आजच्या कामामुळे सुमारे 30 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा कमी झाला आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत, कमी दाबाने व अनियमित होण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुपारी बारा वाजेपासून सायंकाळपर्यंत ज्या भागात पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार व्हायला हवा होता. तो होऊ शकणार नाही. शिवाय, बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठ्यावरही थोडाफार परिणाम होऊ शकतो. बुधवारचा पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पंपहाऊस उभारले आहे. त्यातून वीस पंपाद्वारे अशुद्ध पाणी उचलून पाइपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 22 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. शुध्द केलेले पाणी वेगवेगळ्या भागातील टाक्यांमध्ये पोचवून त्याद्वारे शहरात वितरित केले जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रावेत बंधारा येथून दररोज सरासरी 510 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. मात्र, समन्याय पद्धतीने सर्वांना समान पाणी मिळावे, यासाठी गेल्या 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय, मंगळवारी रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील पंपगृहांमधील दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात आले. परंतु, सव्वातास जलउपसा बंद राहिल्याने दुपारनंतरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होऊ शकतो, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.