कोण म्हणते गुटख्याला बंदी? या ठिकाणी होते खुलेआम विक्री

Gutkha
Gutkha

पिंपरी - कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. काहींना खायला अन्न मिळेना. मात्र, पुणे जिल्ह्यात व्यसनी लोकांचे चोचले पुरवले जात होते. राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणली असली तरी त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तीन महिन्यांत पुणे जिल्ह्यातील छापे टाकून ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ३४ जणांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेटसारख्या घातक घटकांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. तंबाखुजन्य पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या निर्णयाला दहा वर्षे उलटली. मात्र, कायद्यातील पळवाटा आणि सरकारी यंत्रणांची नजर चुकवून छुप्या मार्गाने आणि चढ्या दराने गुटखा निर्मितीसह राजरोस विक्रीही सुरूच आहे. कर्नाटकातून छुप्या पद्धतीने गुटखा महाराष्ट्रात पोचतो. सीमाभागासह राज्यातही अनेक ठिकाणी गुटखा निर्मितीचे अवैध अड्डे सुरूच आहेत. पुणे जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीला तर अभयच मिळाला असल्याप्रमाणे अगदी छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅंडच्या गुटख्याची विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लॉकडाउनच्या काळातही अशाप्रकारे खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळताच त्या भागात एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले. या कारवाईमध्ये यंत्रसामुग्री, टेंपो, आरडीएमडी गुटखा, एम कंपनीची सुगंधी तंबाखू, मिक्‍स सुपारी, कच्ची सुपारी चुरा, तयार मावा, पिशव्या, चुना, हिरा पान मसाला आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. मावा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.

ओळखीच्याच व्यक्तींना मिळतो गुटखा
राज्यात गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते. कारवाई होऊ नये म्हणून दुकानदारांकडून फक्त नेहमीच्याच ग्राहकांना गुटखा विक्री केली जाते. नवीन विक्रेत्यांना गुटखा विकताना बऱ्याच चौकशींच्या फेऱ्यांना सामना करावा लागतो. गुटखा विक्री करताना नेहमीच्या तुलनेत जादा दर द्यावा लागतो.

माव्याचा पर्याय
गुटख्याला पर्याय म्हणून मावा खाल्ला जातो. माव्यातही तंबाखूचा वापर होत असल्याने तो तयार करणे आणि त्याची विक्री करणे बेकायदा आहे. याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे पान टपऱ्यांमध्ये मावा तयार करून विकला जातो. तरुणाईला माव्याचे व्यसन जडल्याने पान टपऱ्यांवर नेहमीच गर्दी दिसून येते.

गुन्ह्यांची संख्या
एप्रिल - ११
मे - १२
जून -११

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com