ती आली, तिनं पाहिलं अन्‌ लुटून नेलं सारं 

मंगेश पांडे
Friday, 11 September 2020

जवळची ओळख असल्यानं विश्‍वासानं घरातील सोन्याचे दागिने तिला दाखविले. या दागिन्यांवर तिची वक्रदृष्टी पडली.

पिंपरी : जवळची ओळख असल्यानं विश्‍वासानं घरातील सोन्याचे दागिने तिला दाखविले. या दागिन्यांवर तिची वक्रदृष्टी पडली. काही दिवस घरात ये-जा सुरू ठेवून कपाटातील दागिन्यांवर डोळा ठेवला. अन्‌ अखेर तब्बल साडेचार लाखांच्या दागिन्यांवर 'त्या' महिलेनं हात साफ केल्याची घटना भोसरीत उघडकीस आली. त्यामुळं ती आली...तिन पाहिलं...अन्‌ लुटलं असे म्हणण्याची वेळ तक्रारदारावर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनाली श्रीकृष्ण मुंढे (वय 22, रा. शास्त्रीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. रेखा गणेश सांगळे (वय 27, रा. गणेश कॉलनी नंबर 2, शास्त्रीचौक, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे आई-वडील व सांगळे कुटुंब अकोले येथील एकाच भागातील असल्याने त्यांची पूर्वीपासूनच ओळख होती. ते भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत अनेक दिवसांपासून काही अंतरावर राहायला असल्याने आरोपीच्या आई-वडिलांचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे असायचे. सोनालीचीही कधीतरी ये-जा असायची. सांगळे कुटुंबीय तिला बहिणीसारखे मानायचे. दरम्यान, सोन्याचे दागिने करण्याच्या बहाण्याने सोनाली फिर्यादीच्या घरी गेली. दागिने कशा पद्धतीचे बनवू, कोणती डिझाईन घेऊ, हेच सुचत नसल्याचे सांगत फिर्यादीकडील दागिने दाखविण्यास सांगितले. सांगळे यांनीही विश्‍वासाने घरातील कपाटातील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तिच्यासमोर मांडले. या दागिन्यांवर तिची वक्रदृष्टी आहे, हे सांगळे यांच्या लक्षातही आले नाही. दागिने पाहताना त्यांच्या चांगल्या गप्पाही रंगल्या. दागिने पाहून ती निघून गेली. त्यानंतरही तिची ये-जा सुरू होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, काही दिवसांनी सांगळे यांनी कपाटात पाहिले असता नेहमीच्या ठिकाणी दागिने नव्हते. चार लाख 63 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जाग्यावर नसल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, कुठेही दागिने सापडेना. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. 

...अन्‌ संशय बळावला 
पोलिसांनी घराची पाहणी करण्यासह आजूबाजूलाही चौकशी केली. काही दिवसांच्या कालावधीत घरात कोणी येऊन गेले का, या बाबत चौकशी केली असता सोनालीचे नाव पुढे आले. तिची सविस्तर माहिती घेतली असता सांगळे यांच्यासह पोलिसांचाही तिच्यावर संशय बळावला. ती कामाला जात असलेल्या कंपनीतून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्‍या दाखविताच दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक करून तिच्याकडील काही दागिनेही हस्तगत केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a woman stole gold jewelery in bhosari