कोविड सेंटरमध्ये काम करीत असल्याने महिलेला बेदम मारहाण; पिंपळे गुरवमधील धक्कादायक घटना 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

फिर्यादी महिला कोविड सेंटरमध्ये कामाला आहेत.

पिंपरी : "तू कोरोना पेशंटच्या दवाखान्यात काम करतेस, तू वर येत जाऊ नकोस', असे म्हणत इमारतीतील शेजारील रहिवाशांनी महिलेला मारहाण केली. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली असून, सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संतोष कुंभार, गणेश कुंभार, छाया कुंभार, सोनम कुंभार, अश्‍विनी कुंभार व सुहास कुंभार (सर्व रा. अनुराग बिल्डिंग, सर्व्हे क्र. 61, अनंतनगर, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी महिला कोविड सेंटरमध्ये कामाला आहेत. कामावरून घरी आल्यानंतर पाण्याची आवश्‍यकता असल्याने त्या पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात होत्या. तेव्हा छाया कुंभार हिने त्यांना अडवून 'तू वर कशाला चाललीस, तू कोरोना पेशंटच्या दवाखान्यात काम करतेस, वर येत जाऊ नकोस', असे म्हणत त्यांना वर जाऊ दिले नाही. त्यानंतर छाया व संतोष हे फिर्यादीबाबत अश्‍लील भाषेत बोलले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोनम व अश्‍विनी यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करू लागल्याने फिर्यादी घरात पळून गेल्या. त्यावेळी फिर्यादीची मुले टॅबमध्ये शुटींग काढत असल्याने आरोपी बेकायदेशीररित्या फिर्यादीच्या घरात शिरले. आरोपी संतोष याने फिर्यादीला काठीने मारहाण व शिवीगाळ करीत फिर्यादीच्या मुलाचा टॅब फोडला. तर गणेश याने फिर्यादीशी अश्‍लील वर्तन केले. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a woman working at the Covid Center was beaten by neighbors at pimple gurav

Tags
टॉपिकस