esakal | पाणी जपून वापरा; पिंपरी-चिंचवडमधील गृहिणींचा सल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी जपून वापरा; पिंपरी-चिंचवडमधील गृहिणींचा सल्ला 
  • दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत समाधान 

पाणी जपून वापरा; पिंपरी-चिंचवडमधील गृहिणींचा सल्ला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कमी दाबाने, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे शहराच्या सर्व भागात समन्याय पद्धतीने पाणी वितरणासाठी महापालिकेतर्फे २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या निर्णयाला जवळपास १६ महिने झाले आहेत. त्याबाबत शहरातील गृहिणी समाधानी असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवले. दिवसाआड पाणीपुरवठा जणू अंगवळणी पडला आहे. मात्र, आता उन्हाळा सुरू झाल्याने पाणी जपून वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून महापालिका अशुद्ध जलउपसा करते. तेथून पाइपद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. शुद्ध केलेले पाणी शहरात वितरित होते. दररोज साधारण ५१० दशलक्ष लिटर पाणी महापालिका घेते. २५ नोव्हेंबर २०१९ पूर्वी हे ५१० दशलक्ष लिटर पाणी दररोज संपूर्ण शहरात वितरित केले जात होते. मात्र, कमी दाबाने व अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी २५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. म्हणजेच ५१० दशलक्ष लिटर दैनंदिन पाणी उचल कायम असून पुरवठा मात्र, अर्ध्या शहरालाच केला जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याबाबत नागरिकांचे विशेषतः गृहिणींचे मत जाणून घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राहुल कलाटे यांचा राजीनामा; पिंपरी-चिंचवड शिवसेनेत दोन गट

गृहिणी म्हणतात... 

मी खोपोलीला राहात असताना प्यायचे पाणी वेगळे आणि वापरासाठीचे पाणी वेगळे होते. बोअरिंगला पंप बसवून सोसायटीने वापरासाठी ते पाणी वेगळ्या कनेक्शनने दिले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा खर्च आपोआप कमी होई. आता आम्ही सोसायटीच्या खालील टाकीत पाणी साठवतो. कमीत कमी पाणी वापरतो. सकाळी व संध्याकाळी केवळ दोनच वेळा एक तास पाणी सोडले जाते. दिवसाआड पाणी आले, तरी वापरणे आपल्या हाती आहे. 
- माधुरी डिसोजा, यमुनानगर, निगडी 

पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या दिवसाआड पाणी ठिक आहे. मात्र, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा आवश्‍यक आहे. नवीन नळजोड देताना महापालिकेने उपलब्ध पाणी व पाइपचा आकार याचा विचार करायला हवा. दीर्घकाळाचे नियोजन करून निर्णय घ्यायला हवा. शिवाय उपलब्ध पाणी व त्याचा वापर यावरही चिंतन व्हायला हवे. 
- रजनी मुरडे, केशवनगर, चिंचवड 

पाणी बचत ही काळाची गरज आहे. यावर चिंतन करायला हवे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही. सगळ्यांनी मिळून त्याबाबत निर्णय घ्यायला हवा. पण, मीच किंवा मी एकट्यानेच का करायचे? असा विचार करत बसण्याऐवजी स्वत:पासून सुरुवात करायला हवी. मी स्वतः पाणी काटकसरीने वापरते आहे. कारण, ते जीवन आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी द्या; पण, पुरेसे द्यायला हवे. 
- वर्षा बालगोपाल, शाहुनगर, चिखली 

दरवर्षी आपण उन्हाळ्यात होणारे मराठवाड्यातील हाल पाहत असतो. त्यामानाने आपण पिंपरी-चिंचवडकर फारच सुखी आहोत. पाणी बचतीचा योग्य विचार आपण प्रत्येकाने जोपासला पाहिजे. कारण, तरुणपणाची काटकसर ही जशी म्हातारपणाची आरामखुर्ची आहे, तसे आतापासून केलेली पाण्याची काटकसर ही उन्हाळ्यासाठी फारच आवश्यक ठरणार आहे. 
- जयश्री गुमास्ते, विनायकनगर, नवी सांगवी 

बिसलेरी पाण्याच्या तोडीचे पाणी महापालिका आपल्याला पुरवत आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, दररोज पाणीपुरवठा व्हावा, असे नागरिकांना वाटणे अयोग्य नाही. पण, वाढत्या शहरीकरणामुळे व पाण्याची वाढती मागणी विचारात घेता, दिवसाआड पाणी ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर हेच ध्येय कृतीत आणले पाहिजे. 
- मीरा कंक, पिंपळे गुरव