
आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : केंद्र सरकारने शेतकरी व कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी गुरूवारी पिंपरीत आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कामगार संघटनेचे पदाधिकारी कैलास कदम, केशव घोळवे, अजित अभ्यंकर, इरफान सय्यद, मारुती भापकर, संजीवन कांबळे, संदीप भेगडे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा, साथीचे रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कामगार संघटनेचे पदाधिकारी व त्यांचे समर्थक एकत्र जमले. मानवी साखळी तयार करून केंद्र सरकारने कामगार व शेतकरी कायद्यात केलेल्या बदलाच्या निषेधार्थ झेंडे, फ्लेक्स, बॅनर घेऊन तसेच घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रशासनाचे आदेश उल्लंघन करण्यात आले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू असतानाही एकत्र जमून मानवी जिवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच रहदारीसही अडथळा निर्माण केला. यामुळे पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.