esakal | ...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

ycm

कोविड व नॉन कोविड रुग्ण एकत्र असताना संसर्गाची टांगती तलवार वायसीएम प्रशासनावर कायम आहे.

...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी, ता. 1 : महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हे नॉन कोविड रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. नॉन कोविड रुग्णांसाठी हे रुग्णालय गेल्या एक महिन्यांपासून खुले झाले आहे. तत्पूर्वी नॉन कोविड उपचारासाठी लोकांवर इतर दवाखान्यांत हेलपाटे मारण्याची वेळ आली. तसेच, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. गेल्या पंधरा दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने रुग्णालय पुन्हा कोविड सेंटर केले जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
कोविड व नॉन कोविड रुग्ण एकत्र असताना संसर्गाची टांगती तलवार वायसीएम प्रशासनावर कायम आहे. रुग्णालयात सरासरी विविध उपचारासाठी दररोज 95 ते 100 रुग्ण दाखल होत आहेत. दररोज बाह्यरुग्ण विभागातील संख्या 125 च्या पुढे जात आहे. ऑर्थोपेडिक व मेडिसीनला सर्वाधिक गर्दी होत आहे. तसेच दररोजच्या प्रसूती 25 ते 30 होत आहेत. त्यामुळे वायसीएम पुन्हा कोविड घोषित झाल्यास रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येणार आहे. खासगी दवाखान्यांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असल्याने ते परवडणारे नाही.
सध्या वायसीएममधील तीन मजले नॉन कोविड व दोन मजले कोविडसाठी राखीव ठेवले आहेत. पदव्युत्तर विभागानेही रुग्णालय नॉन कोविड करण्याची मागणी केली होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोरोना मृत्यूदरही कमी झाल्याने प्रशासनाने वायसीएम नॉन कोविड केले. मात्र, सर्वसामान्यांसाठी वायसीएम नॉन कोविड असणे गरजेचे आहे.

नॉन कोविड आयपीडी (आंतररुग्ण विभाग) रुग्णसंख्या

 • मेडिकल - 193
 • ऑर्थोपेडिक - 35
 • सर्जरी - 31
 • प्रसूती - 100


नॉन कोविड ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) रुग्णसंख्या

 • मेडिकल -145
 • स्कीन - 36
 • सर्जरी - 53
 • ऑर्थोपेडिक - 58
 • ईएनटी - 26
 • प्रसूती - 80
 • इतर - 56


दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अद्यापतरी वायसीएम कोविड सेंटर करण्याचा विचार नाही. नेहरूनगर व ऑटो क्‍लस्टर जम्बो कोविड सेंटर आहेत. गरज पडल्यास वायसीएम कोविड सेंटरचा निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता