
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत कायमच तिच्या प्रोजेक्टसमुळे आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकून घेते. अभिनेत्रीसोबत निर्मातीही म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या शर्मिष्ठाचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास खूप खडतर राहिला आहे.
नुकतंच एका मुलाखतीत तिने घटस्फोटावेळी केलेला मानसिक तणावाचा सामना आणि त्यातून तिने घेतलेला महत्त्वाचा निर्णय यावर भाष्य केलं.
2018 मध्ये शर्मिष्ठाने तिच्या पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला पण दरम्यानच्या काळात तिला झालेला त्रास तिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केला. ती म्हणाली,"माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया जेव्हा सुरु होती तेव्हा मी 'किती सांगायचंय मला' या मालिकेत सीमा देशमुखबरोबर काम करत होते. त्यावेळी तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी सेटवर यायचे आणि थेट आत जाऊन मेकअप रूममध्ये बसायचे. माझ्या डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी वाहत असायचं. त्यावेळी सीमा ताई यायची आणि मला घट्ट मिठी मारायची आणि मी रडायचे. त्या काळात सीमा ताई, मधुगंधा, ललित, उदय काका, गिरीश काका यांनी मला खूप सपोर्ट केला. मधुगंधा मला रोज फोन करून माझी चौकशी करायची. सुकन्या ताई न चुकता मला मेसेज करायची. ललितनेही माझी खूप साथ दिली."
पुढे ती म्हणाली,"करिअरसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अनेकांनी मला मदत केली. ते माझे गुरु झाले. मी माझे पैसे कसे मॅनेज करायला हवेत. कोणतं काम स्वीकारायला हवं? कोणत्या भूमिका करायला हव्यात? याची दिशा त्यांनी मला दिली."
"मी 'बिग बॉस'च्या घरात गेले तेव्हा मी एक निर्णय घेतला. तो निर्णय माझं आयुष्य बदलणारा होता आणि तो होता लग्नाचा. हा निर्णय घ्यावा म्हणून रेशम ताई, मेघा, सई आणि आऊ (उषा नाडकर्णी) यांनी अक्षरशः माझं ब्रेनवॉश केलं. मी जशी बाहेर आले तशी मी विवाहसंस्थेत नाव नोंदवलं. सात मुलांना भेटल्यानंतर आठवं स्थळ मला तेजसचं आलं आणि आता मी आयुष्यात खूप खुश आहे."
तेजसशी लग्न करण्यापूर्वी शर्मिष्ठाचं लग्न अमेय निपाणकरशी झालं होतं. त्यांचा प्रेमविवाह होता. दहा वर्षं संसार केल्यानंतर काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2018 मध्ये ही जोडी विभक्त झाली.