
दिग्गज मराठी गायिका अनुराधा पौडवाल यांना राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. आता त्यावर अनुराधा यांची मुलगी कविता पौडवाल हिने आपला आनंद व्यक्त केला आहे.
सकाळशी बोलताना कविता म्हणाली, 'राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ माझ्या आईला अर्थात ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाल्याची बातमी कानावर आली आणि माझ्या मनाने पुन्हा आनंदाची भरारी घेतली. कधी कधी आपल्या आयुष्यात असे क्षण येतात की एखादी गोष्ट कितीही मोठी असली तरी तिची सवय होऊन जाते. जसे शाळेत एखादा विद्यार्थी नेहमीच पहिला क्रमांक मिळवतो आणि आपल्याला त्यात नवे असे काही वाटत नाही. परीक्षा होतच असतात आणि तोच विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये पास होत असेल तर आपल्याला त्याचे आश्चर्य वाटणे थांबते. आमच्या आईच्या बाबतीत असेच काहीसे घडत आले आहे.'
ती पुढे म्हणाले, 'जेव्हा आम्हाला समजले, की आईचा गौरव होणार आहे तेव्हा आमची पहिली भावना होती, की ‘अरे व्वा, अजून एक पुरस्कार!’ नंतर मात्र त्या पुरस्काराचे खरे महत्त्व लक्षात आले तेव्हा आम्ही सर्व जण खूपच भावूक झालो. कारण पुरस्कार साक्षात लतादीदी यांच्या नावाचा आहे आणि म्हणूनच तो श्रेष्ठ ठरतो. त्याचे महत्त्व आमच्यासाठी खूप मोठे आहे. एक आई म्हणून तिने मला नेहमीच प्रोत्साहन दिले. तिने केवळ मला आईच्या नात्यानेच घडवले नाही तर एक गायिका म्हणूनही तिने लाखो-करोडो संगीतप्रेमींच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या गायकीचा प्रभाव इतका प्रचंड आहे, की मी त्यांच्या पोटी जन्माला आले याचा सार्थ अभिमान आहे.'
आईचं कौतुक करत ती म्हणाली, 'लहानपणापासून माझ्या कानात सुरांचे बोल पडत होते. साहजिकच अगदी तेव्हापासून मला सुरांचे महत्त्व कळत आले. मी आईकडून केवळ संगीत शिकले नाही, तर त्यातले बारकावेही शिकून घेतले. आईचे योगदान त्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आई आणि वडील अरुण पौडवाल यांनी माझ्यावर संगीताचे संस्कार केल्यानेच मी आणि माझा भाऊ आदित्यने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. संगीत क्षेत्राची निवड करणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा आदरच आहे. माझ्या आईने गायलेल्या गाण्यांबद्दल सांगायचे तर शब्द अपुरे पडतील. तिची अनेक गाणी माझी आवडती आहेत. मग ती माझ्या बाबांसाठीची असो, शिवभजने असोत की चित्रपटातील असोत.'
आईच्या गाण्यांना उजाळा देताना कविता म्हणाली, '‘नगिना’ चित्रपटातील ‘भोली बिसरी एक कहानी’, ‘आशिकी’मधील ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना’ अन् ‘बस एक सनम चाहिए...’ किंवा ‘बेटा’मधील ‘धक धक करने लगा’ असो, आईचे प्रत्येक गाणे माझ्या मनात खास स्थान मिळवून आहे. त्या गाण्यांची खासियत सांगायची तर त्यांमध्ये असलेली सहजता, भावनिकता आणि साधेपणामुळे ती मनाला भिडतात. माझ्या आईच्या गाण्यात साधेपणा होता आणि तोच सगळ्यांना भावला, असे मी म्हणेन. तिची मराठीतली भक्तिगीते, भजने आणि गाणी आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. आईने गायलेली ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘काळ्या मातीत मातीत’, ‘दिसते मजला सुखचित्र नवे’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘प्रेमाला उपमा नाही’, ‘राजा ललकारी अशी घे’, ‘शंभो शंकरा करुणाकरा’, ‘हा सागरी किनारा’, ‘अश्विनी ये ना...’ इत्यादी मराठी गाणी तिच्या गायनकलेची नजाकतच पेश करतात. आजही ती कानावर पडताच गुणगुणावीशी वाटतात आणि त्यात आईच्या गोड गळ्याचा मोलाचा वाटा आहे. '
'स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे आमच्यासाठी अत्यंत मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. लतादीदींच्या गाण्यांना मी ग्रंथासारखे मोलाचे मानते. त्यांची गाणी म्हणजे संगीताचे ग्रंथ आहेत ज्यातून खूप काही शिकायला मिळते. माझ्या लहानपणीची एक खास आठवण आहे. तेव्हा माझ्या आईंनी लतादीदींची भगवद्गीता ऐकून गाण्याचे ज्ञान घेतले होते. त्या भगवद्गीतेचे सूर अजूनही माझ्या कानात रुळलेले आहेत. त्या दोघींच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि संगीताचे संस्कार मला माझ्या जीवनात मिळाले आहेत, हे माझे भाग्य आहे. माझ्या आईला प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याचे आत्यंतिक समाधान आज होत आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.