

ghabadkund
esakal
दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा २०२४ मध्ये ‘अल्याड पल्याड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. काॅमेडी हाॅरर या जाॅनर प्रकारातील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यामुळे प्रीतम पाटील नेमकी नवीन कलाकृती कोणती आणतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. आता त्यांनी भय, रहस्य, थरार आणि मानवी लोभ-लालसा यांची उत्तम सांगड असलेला ‘घबाड-कुंड’ हा चित्रपट आणलेला आहे. आज प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची तरी अपेक्षा असते आणि त्याकरिता तो सातत्याने प्रयत्न करीत असतो; परंतु ही अपेक्षा जेव्हा अधिक वाढते तेव्हा त्याला लालसा किंवा लोभ म्हटले जाते. आपल्या गरजेपेक्षा अधिक काही मिळविण्याची इच्छा जेव्हा मनामध्ये येते तेव्हा लोभाचे स्वरूप प्राप्त होते आणि अनेकदा ते विनाशाचे कारण ठरते. इतिहास, लोककथा आणि साहित्य यांमध्येही लोभामुळे घडलेल्या घटनांची अनेक उदाहरणे आढळतात. याच गोष्टीवर अर्थात लोभ-लालसा यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे ‘घबाड-कुंड.’ चित्रपटाची कथा एका गूढ खजिन्याच्या शोधाभोवती फिरत असून, मानवी स्वभावातील लोभाचे परिणामही यात अधोरेखित करण्यात आले आहेत.