Crew Movie Review : तिघींची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम पण.. पटकथेत फसलेला चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कित्येक नायिकांचे चित्रपट ‘हंड्रेड करोड क्लब’मध्ये समाविष्ट झालेले आहेत. डान्स, रोमान्सबरोबरच अॅक्शनदेखील त्या उत्तम प्रकारे करू शकतात हे सिद्ध झाले आहे.
Crew Movie
Crew Moviesakal

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कित्येक नायिकांचे चित्रपट ‘हंड्रेड करोड क्लब’मध्ये समाविष्ट झालेले आहेत. डान्स, रोमान्सबरोबरच अॅक्शनदेखील त्या उत्तम प्रकारे करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आता दिग्दर्शक राजेश कृष्णन यांच्या ‘क्रू’ या चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या तीन नायिकांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा या तीन नायिकांभोवतीच फिरणारी आहे.

गीता सेठी (तब्बू), जस्मिन कोहली (करीना कपूर-खान) आणि दिव्या राणा (क्रिती सेनॉन) या तिघी जणी कोहिनूर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत असतात. ही एअरलाइन्स विजय वालिया (शाश्वत चॅटर्जी) यांच्या मालकीची असते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी चार हजार कर्मचाऱ्यांचा पगार थकविलेला असतो. त्यामुळे सगळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेले असतात. गीता, जस्मिन आणि दिव्या या तिघीही मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. गीताचा पती अरुण (कपिल शर्मा) हा आर्थिक परिस्थितीशी झगडत असतो. गीताच्या पगारावर हे कुटुंब अवलंबून असते. तिला भविष्यात गोव्यामध्ये स्वतःचे रेस्टॉरंट उघडायचे असते.

जस्मिनला स्वतःची कंपनी काढायची असते, तर दिव्या हरियाणाची टॉपर असते आणि पायलट बनायचे तिचे स्वप्न असते. या तिघींची निरनिराळी स्वप्ने असतात; परंतु आता या तिघीही एअर होस्टेस बनलेल्या असतात. अशातच एके दिवशी त्यांचाच एक ज्येष्ठ सहकारी राजवंशीचा (रमाकांत दायमा) विमानातच मृत्यू होतो. त्यानंतर कथेला वेगळी कलाटणी मिळते. राजवंशीच्या मृतदेहावर सोन्याची बिस्किटे असतात. ती पाहून या तिघींना मोह आवरत नाही. त्यातच आपली विमान कंपनी तोट्यात आहे. सहा महिने आपला पगार थकविला गेला आहे. आपल्या घरची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. त्यामुळे या तिघीही सोन्याच्या तस्करीमध्ये अलगद अडकतात आणि त्यानंतर पुढे कशा आणि कोणत्या घडामोडी घडतात हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे.

दिग्दर्शक राजेश कृष्णन यांनी तोट्यात असलेल्या एअरलाईन्स आणि त्याचबरोबर त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीवर परखड भाष्य या चित्रपटात केले आहे. ही कथा मांडताना त्यांनी भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा योग्य असा समतोल साधला आहे. विशेष म्हणजे विनोदाच्या अंगाने जाणारी ही कथा आहे. मात्र, पटकथा भक्कम नसल्यामुळे चित्रपट पाहताना निराशा पदरी पडते. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन या तिघीही हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या नायिका. त्यामुळे या तिघींकडून खूप अपेक्षा उंचावलेल्या होत्या; परंतु या तिघींनीही म्हणावी तशी दमदार कामगिरी केलेली दिसत नाही. केवळ त्यांचे हॉट लूक आणि ग्लॅमरस-स्टायलिश दिसणे एवढीच त्यांची कामगिरी.

मात्र, तिघींची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. दिलजित दोसांझ, तृप्ती खामकर, राजेश शर्मा आदी कलाकारांनीदेखील या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी आपल्या परीने साकारल्या आहेत. तृप्ती खामकरने आपल्या भूमिकेत चांगली छाप पाडली आहे. चित्रपटातील संवाद खुसखुशीत आहेत. संगीताच्या बाबतीत बोलायचे तर ‘चोली के पीछे क्या है’, ‘घाघरो ज्यो घुम्यो’ आणि ‘सोना कितना सोना है’ ही गाणी रिक्रिएट करण्यात आली आहेत. अनुज राकेश धवनची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. दिग्दर्शक राजेश कृष्णन यांनी हा चित्रपट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस बनविण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे पटकथेकडे दुर्लक्ष झालेले आहे. साहजिकच चित्रपट मनाची फारशी पकड घेत नाही. त्यामुळे निराशा पदरी पडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com