
हॉलिवूडमधील पॉवर कपल जेनिफर लोपेझ आणि बेन एफ्लेक यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. जेनिफर आणि बेन लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं काही रिपोर्ट्सनी सांगितलं आहे. या बातम्यांमुळे या जोडीचे चाहते चिंतेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनी दिलेल्या वृत्तानुसार, बेन एफ्लेकने जेनिफरचं घर सोडलं असून लवकरच ही जोडी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु करणार आहे.
गेल्या काही काळापासून बेन आणि जेनिफर यांच्यामध्ये मतभेद सुरु आहेत. त्यामुळेच बेन घर सोडून गेल्याचं म्हंटलं जातंय. जेनिफरने यंदाच्या मेट गाला मध्ये हजेरी लावली होती पण बेन तिच्यासोबत उपस्थित नव्हता. त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
इतकंच नाही तर या जोडीने नुकतंच विकत घेतलेलं आलिशान ड्रीम होम सुद्धा ते विकणार असल्याचं म्हंटलं जातंय. पण यावर या जोडीकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाहीये.
काही रिपोर्ट्सच्या मते, बेनला आता त्याच्या मुलांकडे आणि करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. मुलांच्या देखभालीसाठी ते त्यांनी घेतलेलं आलिशान घरही विकणार आहेत. दोन वर्षं बरीच शोधाधोध केल्यानंतर या जोडीने पूर्वी ईशा अंबानीच्या मालकीचं असलेलं आलिशान घर लॉस एंजेलिसमध्ये त्यांनी 61 मिलियन डॉलर्सला विकत घेतल्याची चर्चा होती. या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पण जेनिफरने अजूनतरी तिचे आणि बेनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर हटवले नसल्यामुळे चाहत्यांच्या मनात सगळं काही ठीक असेल अशी आशा आहे.
रिपोर्ट्सनुसार, सध्या झालेल्या काही इव्हेंट्समध्ये जेनिफरने एकटीच हजेरी लावली आहे. मेट गालामध्ये सुद्धा ती एकटीच रेड कार्पेटवर दिसली होती. गेल्या जवळपास ४७ दिवसांपासून ही जोडी एकत्र दिसली नाहीये. जेनिफर सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ती तिचा आगामी सिनेमा अटलसच्या प्रोमोशनमध्ये बिझी आहे तर बेन द अकाऊंटंट 2 या सिनेमाच्या तयारीत बिझी आहे.
16 जुलै 2022 ला लास वेगास मध्ये या जोडीने प्रायव्हेट पण आलिशान सोहळ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला मोजकी मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. जेनिफरचं हे तिसरं लग्न असून बेनचं हे दुसरं लग्न आहे.