
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. प्रत्येक चित्रपटाचा आशय आणि विषय निराळा असतो. कौटुंबिक, विनोदी तसेच हॉरर कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट तयार होत असतात. आता असाच वेगळ्या धाटणीचा 'जिलबी' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. निर्माते आनंद पंडित व रुपा पंडित तसेच दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी हा चित्रपट बनविलेला आहे. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, प्रणव रावराणे, गणेश यादव आदी कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. समज-गैरसमज, विश्वास- अविश्वास, राग-लोभ, प्रेम-तिरस्कार, संशय-भरोसा, थरार आणि रहस्याने गडद असा हा चित्रपट आहे. दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी या चित्रपटाची कथा अशी काही बांधली आहे की ती शेवटपर्यंत चांगलीच खिळवून ठेवणारी झाली आहे. शेवटी जेव्हा या कथेतील रहस्य उघड होते तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो.