Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil : ‘संघर्षयोद्धा’मुळे वेगळे काम केल्याचा आनंद!

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Sakal
Updated on

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याच संदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्याशी केलेली बातचीत...

- मयुरी महेंद्र गावडे

दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात तुम्ही कशी केली?

- शाळेत असताना शिक्षकांनी मला मोठा होऊन काय बनायचं आहे, असा प्रश्‍न विचारला असता मला चित्रपटात काम करायचे असल्‍याचे मी सांगितले होते. सुरुवातीला मी दाक्षिणात्‍य चित्रपटसृष्‍टीत काम केले. जवळपास चार-साडेचार वर्षे मी तिथे काम केले. त्यामुळेच माझ्या प्रत्येक चित्रपटात काम करणारी अर्धी लोकं दक्षिणेतील असतात. तिथपासून माझी सुरुवात झाली. त्‍यानंतर मी मराठी चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलो.

हा चित्रपट का करावासा वाटला?

- २०२३ मध्ये माझा ‘खळगं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी निर्माते, कलाकार आणि आमची सर्व टीम एकत्र बसलो असता हा विषय आमच्यासमोर आला. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच आम्ही निर्णय घेतला की, मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आपण बायोपिक बनवायची.

त्यानंतर आमची टीम आणि आम्ही पाटील यांना भेटलो. त्यांना सांगितले की, तुमच्या जीवनावर आम्हाला एक चित्रपट बनवायचा आहे. त्यावेळी त्यांना यावर विश्वासच बसत नव्हता की, त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार होणार आहे.

त्यानंतर आम्ही त्यांची परवानगी घेतली. मग थोडे त्यांच्याविषयी संशोधन केले. त्यावेळी आम्हाला त्यांची पार्श्वभूमी कळली आणि आमचा हा निर्णय अजूनच दृढ झाला. कायम प्रकाशझोतात असणाऱ्या व्यक्तींवर सगळेच चित्रपट बनवतात; परंतु मनोज जरांगेंसारखे व्यक्तिमत्त्वदेखील सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे, असे मला वाटते.

‘संघर्षयोद्धा’ चित्रपटामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी दाखवणार आहात?

- या चित्रपटात आम्ही पाटील यांच्या एकूणच सगळ्या संघर्षाचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याशी संबंधित आताच्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत; परंतु त्यांची पार्श्वभूमी एवढी कुणाला माहीत नाही. समाजासाठी एवढे मोठे त्‍याग करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाटील यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीविषयी चित्रपटात सर्व दाखवण्यात आले आहे.

बायोपिक बनवण्याचा तुमचा हा पहिलाच अनुभव आहे का?

‘संघर्षयोद्धा’ हा माझा पहिलाच बायोपिक आहे. यापूर्वी मी मुसंडी, मजनू, धुमस यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत; पण हा पहिलाच मी बायोपिक बनवला आहे. खूप मोठे चॅलेंज होते हे माझ्यासाठी. कारण एखाद्या काल्पनिक गोष्टीवर आपण जेव्हा चित्रपट बनवत असतो तेव्हा आपणास आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण त्यात जोडू शकतो; परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट बनवताना असे करता येत नाही. त्यात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी या वास्तविकच वाटल्या पाहिजेत; पण मी आवर्जून एक गोष्ट सांगेन, मनोज जरांगे पाटलांनी मला खरंच खूप मदत केली. फक्त त्यांनीच नाही तर त्यांच्या सोबतचे कर्मचारीदेखील आमच्या मदतीला तेवढेच तत्पर होते. खूप काही नवीन शिकायला मिळाले.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil
Amitabh Bachchan : दहा दिवस चित्रीकरण करुन अमिताभ यांनी सोडला होता चित्रपट

कलाकारांची निवड कशी केली?

- कलाकारांची निवड करताना मला सर्वात महत्त्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे, कलाकारांची भाषाशैली. ही गोष्ट आहे मराठवाडा पट्ट्यातली. त्यामुळे तशी बोलीभाषा कलाकारांना यायला हवी. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.

संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे आदी कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मुख्य म्हणजे जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका मोहन जोशी यांनी साकारली आहे. त्यांच्याविषयी एक सांगेन की, ज्यावेळी आमचा हा कलाकार निवडीचा विषय सुरू होता त्यावेळी ते आजारी होते.

त्यांना नीट बोलताही येत नव्हते. मी त्यांना भेटलो. सर्व कथा त्यांना ऐकवली. त्‍यानंतर ते स्वतःहून काम करायला तयार झाले. त्यांनी खरंच खूप अप्रतिम काम केले आहे. तसेच सुरभी हांडेविषयीसुद्धा सांगायचे झाले तर, तिचा लूक जरांगे पाटील यांच्या पत्नीसारखाच आहे.

 सर्व कलाकारांसोबतचा अनुभव कसा होता?

- खूप छान अनुभव होता. अगदी सुरुवातीपासून चित्रीकरण संपेपर्यंत माझ्या संपूर्ण टीमने एकजुटीने केलेले काम खरंच कौतुकास्पद आहे. हा पहिला चित्रपट असेल ज्यामध्ये आम्ही सर्व गोष्टी अगदी खऱ्या दाखवल्या आहेत. म्हणजे चित्रपटात दाखवलेले घर हे जरांगे पाटलांचेच आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपोषणाच्यावेळी असणारी मंडळी आणि त्यांच्या सर्व संघर्षात त्यांच्यासोबत असणारी माणसेदेखील या चित्रपटात आहेत. त्‍यामुळे चित्रीकरण संपले असता मी काही तरी वेगळे काम केल्‍याची भावना मनामध्ये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com