
मुंबईची लोकल असो की बससेवा, दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. या प्रवासातील अनेक कडू आणि गोड आठवणी प्रत्येकाजवळ असतात. याच प्रवासामध्ये कधी नात्याची घट्ट वीण जोडली जाते तर कधी प्रेमाचे धागे घट्ट बांधले जातात. मुंबईच्या लोकल ट्रेनला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटले जाते. याच लोकलमध्ये एखाद्याचे प्रेम प्रकरण फुलते आणि बहराला येते. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटामध्ये अशाच दोन युगुलांच्या हळूवार जुळणाऱ्या प्रेमाचे बंध गुंफण्यात आले आहेत. हे बंध गुंफताना दिग्दर्शकाने नात्यांमधील भावभावना, एकमेकांचे प्रेम आणि मैत्री छान पद्धतीने मांडलेली आहे. त्यामुळे चित्रपट खिळवून ठेवणारा झाला आहे.