Shantanu Bhake : शहरात आलेल्या लोकांना ‘गाव बोलावतो’ आहे!

गेली चौदा वर्षे शंतनु श्रीकांत भाके कास्टिंग डिरेक्टर म्हणून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. २५० हून अधिक जाहिरातींचं कास्टिंग त्यांनी केलं आहे.
Shantanu Bhake
Shantanu Bhakesakal
Updated on

- सानिका वाळके

गेली चौदा वर्षे शंतनु श्रीकांत भाके कास्टिंग डिरेक्टर म्हणून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. २५० हून अधिक जाहिरातींचं कास्टिंग त्यांनी केलं आहे. ‘धर्मवीर मु. पो, ठाणे’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांबरोबरच बकेट लिस्ट, आनंदी गोपाळ, बाबा, दगडी चाळ २ यांसारखे अनेक मराठी चित्रपट तर सिंबा, सूर्यवंशी, सर्कस, सिंघम अगेन, कौन प्रवीण तांबे, यांसारखे हिंदी चित्रपट आणि इंडियन पोलिस फोर्स, टीव्हीएफ पिचर्स भाग २, समांतर, रक्तांचल यांसारख्या वेबसीरिजसाठी त्यांनी काम केलं आहे.

कामावर असलेली प्रचंड निष्ठा, नम्रता तसेच प्रडंच मेहनत याच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता ‘गाव बोलावतो’ या मराठी चित्रपटाद्वारे ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. याबाबतीत त्यांच्याशी केलेली बातचीत...

तुम्ही कास्टिंग डिरेक्टर होता आणि आता ‘गाव बोलावतो’ या सिनेमाचे निर्माता झालात. ही निर्माता बनण्याची इच्छा तुमच्या मनात कशी निर्माण झाली?

- मी जेव्हा कास्टिंग करायचो त्या दरम्यानच सगळं प्राॅडक्शन बघत होतो. प्रोड्यूसर कसं काम करत आहेत हे वेगवेगळ्या प्रोड्यूसरला भेटून जाणून घेतलं. त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. मग आपणदेखील असं काही तरी करू शकतो असं वाटायला लागलं. तत्पूर्वी मी सहायक कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं. तब्बल सात ते आठ वर्ष ही सगळी प्रोसेस मी बघितली. त्याच वेळी मला लक्षात आलं की निर्माता आणि दिग्दर्शक बनूनच आपण आपला संदेश वा विचार लोकांपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळे मी निर्माता व्हायचं ठरवलं.

या चित्रपटाची कथा तुम्हाला कोणी ऐकवली आणि दिग्दर्शकाची निवड तुम्ही कशी केली?

- माझे पार्टनर प्रशांत नरोडे यांनी मला हा विषय सुचविला. त्यांची संस्कार वाहिनी नावाची संस्था आहे तसेच ते एनजीओदेखील चालवतात. ते गावातल्या लोकांसाठी काम करतात. एनजीओचं काम करताना त्यांना हे कथानक सुचलं आणि त्यांनी ते मला सांगितलं.

तुमच्या चित्रपटाचं नाव काहीसे हटके वाटते, त्या मागची गंमत किंवा वा कल्पना कुणाची आहे?

- हे नाव वैभव जोशी यांनी सुचविलं. त्यांनी आमच्या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. गाण्याच्या ओळीतच सर्व काही आहे. खरं तर आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गावातून आलोय आणि कुठल्या ना कुठल्या शहरात स्थायिक झालोय. कारण गावाला त्या सगळ्या सुखसोयी मिळत नाहीत म्हणून तर गावं सगळी ओसाड पडलीत. गावात कोण राहायला मागत नाही. सगळी तरुण पिढी आज शहराकडे वळते आहे. येथे ती स्थायिक होते आहे; पण आपलं गाव आपल्याला नेहमी बोलावत असतं. हाक मारत असतं. पण आपल्याला त्याची हाक कधी ऐकायलाच येत नाही आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हाच विचार घेऊन आम्ही या फिल्मची निर्मिती केली.

चित्रपटाची नेमकी कथा काय आहे?

- एक गावातला मुलगा कामानिमित्त शहरात येतो आणि लग्न वगैरे करून तो शहरातच स्थायिक होतो. त्यानंतर त्याच्या वडिलांचे निधन होते, म्हणून तो गावाकडे येतो आणि तेरा दिवस राहतो. तेव्हा त्याला समजतं की गावात सुखसोयी नाहीत. साध्या गरजेच्या गोष्टीही मिळत नाहीत. त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं की त्याने शिकून-सवरून गावाला येऊन प्रगती करावी. त्याचे वडील गावामध्ये सामाजिक कार्य करीत असतात. ते त्याला वारंवार पत्राद्वारे विविध बाबी सांगत असतात. पण ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचत नसते. पण जेव्हा तो येतो आणि हे सगळं पाहतो तेव्हा त्याला वडिलांच्या बोलण्याची आठवण होते. मग तो पुढे त्यांची ही इच्छा पूर्ण करतो की नाही, ते तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल.

या चित्रपटाची शूटिंग कुठे कुठे झाली?

- भोर येथे अर्धेअधिक चित्रीकरण झाले आहे. तसेच वाईलादेखील थोडे फार चित्रीकरण केले आहे.

या चित्रपटात तुम्ही काय सामाजिक संदेश दिलाय का?

- हा विषयच मुळात सामाजिक संदेश देणारा आहे. आम्ही हा विषय व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मांडलेला आहे. गावामध्ये भेडसावणारे विविध प्रश्न आणि मुद्दे घेतले आहेत. त्यांच्या सोडवणुसकीसाठी काय केले पाहिजे, हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पैसे कमावण्यासाठी गाव सोडून शहरात जावं लागतं का, यावर तुमचं मत काय आहे?

- माझं असं मत आहे की आपण गावात राहून गावासाठी काही तरी व्यवसाय सुरू करू शकतो का याचा विचार केला पाहिजे. ऑरगॅनिक फॉर्मिंग करूनही आपण राहू शकतो. गावचा विकास करताना आपलाही विकास कसा करावा हाच आमचा मुद्दा आहे. तोच आम्ही सिनेमाच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com