आपल्या अवतीभोवती जे काही सुरू असते त्याचे पडसाद कलामाध्यमांत उमटत असतात. त्यासोबतच वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावही कलेच्या क्षेत्रात जाणवत असतो. घराघरात बघितल्या जाणाऱ्या टीव्हीवरील ‘रियालिटी शो’नेही आपल्या जगण्यावर गारुड घातलेले असते. त्याचे प्रतिबिंब नाट्यकलाकृतींवरही उमटते.
बिग बॉस, कौन बनेगा करोडपती, टॅलेंट शोचाही प्रभाव आपल्या कथा-कवितेत, चित्रपटात, नाटकात दिसतात. अशाच प्रभावाची जाणीव करून देणारे ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक अलीकडेच मराठी रंगभूमीवर आले आणि ते हसवता हसवता आपल्या जगण्यातील उणिवा-जाणिवांवर प्रभावी भाष्य करणारे ठरते आहे.
सर्वसामान्य घरात अनेक अडचणींवर मात करीत आपापला आनंद शोधण्यात प्रत्येक सदस्य जगत असतो. त्यात प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. घरातील आवराआवर करणाऱ्या गृहिणीचे सर्वांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करीत इतरांना आनंद वाटण्यात दिवस सरत असतात. असेच एक कदम कुटुंब. त्यांच्या घरातही असेच काही रुसवे-फुगवे, चिमूटभर आनंद आणि हसता-खेळता संघर्ष.
त्या संघर्षातून जगणे आनंददायी करणारी एक संधी त्यांना मिळते आणि रंगत जाते ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक.
कदम हे चार सदस्यांचे सर्वसामान्य कुटुंब. दीपक कदम ऊर्फ गोट्या काका (प्रसाद खांडेकर) हे या कुटुंबाचे प्रमुख. त्यांची पत्नी संध्या ( नम्रता संभेराव) घरातल्या सगळ्या सुखदु:खाची ओझी वाहणारी. या दाम्पत्याचा मुलगा राहुल (ओंकार राऊत). त्याला अभिनय क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यासाठी त्याचा स्ट्रगल सुरू आहे. त्याची लहान बहीण श्रुती (शिवाली परब) सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करून त्यावर मिळणाऱ्या प्रतिसादात गुंतलेली.
किती लाइक्स मिळतात तीच तिची मिळकत. या चौकोनी कुटुंबातील गोट्या काकाने मुंबईत फ्लॅट घेऊन काही इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याचे येणारे भाडे आणि कर्जाच्या इन्स्टॉलमेंटची जुळवाजुळव करीत ते घर चालवत आहेत. मुलगा अद्याप काहीच करीत नाही. अजूनही पैशासाठी तो हात पसरतो, याचे त्यांना शल्य आहे. सुरुवातीला ही सारी परिस्थितीची जाणीव करून देत नाटक पुढे सरकत जाते.
एक दिवस राहुल अतीव आनंदाने घरात प्रवेश करतो आणि टॉप टेनमध्ये स्वत:चे सिलेक्शन झाल्याचे सांगतो. कुटुंबीयांना काही कळतच नाही. आता स्ट्रगल संपला. वडील त्याचे काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. तो काहीही करू शकत नाही. तो कालही स्ट्रगलर होता, आजही आहे आणि उद्याही राहील. तो काहीही संपवू शकत नाही, केवळ माझे पैसेच संपवू शकतो. राहुल कुटुंबीयांना सर्व काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.
तो म्हणतो, एक रियालिटी शो आहे. त्यात महाराष्ट्रातील दहा कुटुंबे निवडली आहेत. त्यात आपणही आहोत. या शोमध्ये आपल्या घरात कॅमेरे लागतील आणि शो सुरू झाल्यानंतर आपण संबंध महाराष्ट्रात लाइव्ह दिसू. हा शो कंडक्ट करणारा एक गॉडफादर असेल. त्यावर गोट्या काका म्हणतात, आपले खासगी आयुष्य सर्व महाराष्ट्रासमोर उघड का करायचे?
त्यावर राहुल सांगतो, या शोमध्ये सहभागी व्हायचे आपल्याला मिळणार आहेत ५० लाख रुपये आणि हा शो जिंकलो तर मिळतील एक कोटी रुपये. ही रक्कम ऐकताच गोट्या काका निरुत्तर होतात. संध्या कर्जाचे हप्ते, पोरीचे शिक्षण, महागाईचा पाढा वाचते. नम्रता संभेरावने हा प्रसंग लाजवाब रंगवला आहे.
सोबत गोट्या काकाची घालमेल प्रसाद खांडेकरने रंगवून टाळ्या वसूल करीत या ‘थेट तुमच्या घरातून...’ रियालिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. शो सुरू होतो आणि कदम कुटुंबासाठी ‘गॉडफादर’ एक गिफ्ट पाठवतो. हे गिफ्ट म्हणजे या कुटुंबात सारा लेले (भक्ती देसाई) नावाची एक अनोळखी तरुणी पाहुणी म्हणून प्रवेश करते. ती या नाटकाला कसे ट्विस्ट करते, त्यासाठी नाटकच बघितलेेले बरे.
लेखक-दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकरने या नाटकाची बांधणी उत्तम केली आहे. त्यांनी पेरलेल्या कथाबीजातून तयार झालेल्या नाट्याविष्काराने करमणूक करण्याची कुठलीही कसर सोडलेली नाही. नाटकभर ठिकठिकाणी टाळ्या वसूल करण्याची हुकमत नोंद घेण्यासारखीच आहे. कलाकार म्हणून प्रसाद खांडेकरसह नम्रता संभेराव, ओंकार राऊत, शिवाली परब, भक्ती देसाई आणि प्रथमेश शिवलकरने जोरदार बॅटिंग केल्याने एकापेक्षा एक सरस अभिनयाची जुगलबंदी यात रंगली आहे. त्यातही ओंकारने गायलेली गझल तर प्रयोगाला उंचीवर नेणारी आहे.
प्रजाकार प्रॉडक्शन आणि सोहम प्रॉडक्शन निर्मित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचे नेपथ्य (संदेश बेंद्रे), संगीत (सुशील कांबळे), प्रकाशयोजना (श्याम चव्हाण), वेशभूषा (पूर्णिमा ओक) आणि रंगभूषा (उलेश खंदारे) या कलाविष्कारासाठी यथोचित ठरले आहे. नाटकाचे एकूण विणकाम आणि दिग्दर्शकीय कौशल्याने हे नाटक रसिकांच्या मनात घर करणारे आहे.
mahendra.suke@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.