
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. २०२५मध्ये आतापर्यंत १९२ नक्षलवादी ठार करण्यात आले. सरकारच्या ‘बळ आणि विकास’ यांच्या संयुक्त धोरणामुळे नक्षलवादाचा अंत आता केवळ स्वप्न न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरू पाहतो आहे. भारत प्रथमच नक्षलमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे...
खोल तांबट लाल माती, रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल, खडतर वाटांनीच एकमेकांना जोडणारी काही वस्ती. लोखंडी खनिजांनी समृद्ध असलेल्या ५,००० चौरस किमीच्या परिसराची वर्षानुवर्षे माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख. लहान लहान ओढे, वेड्यावाकड्या डोंगररांगेत काही ठिकाणी तर फक्त पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. गुगल मॅप्सवर तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्यामधील सीमारेषा विभागणाऱ्या एका विशिष्ट डोंगररांगेचे स्थान ‘करेगट्टा’ आणि ‘ब्लॅक हिल्स’ असे दाखवले जाते. मात्र स्थानिक आदिवासींमध्ये हे ठिकाण ‘करेगुट्टालू’ या नावाने प्रसिद्ध आहे.
संबंधित भाग माओवादी संघटनेतील प्रभावशाली आणि धोकादायक मानला जाणारा बसवराजू याचा होता. माओवादी संघटनेच्या सर्वात महत्त्वाच्या तीन गटांचा म्हणजेच सेंट्रल कमिटी, पोलिटब्युरो आणि सेंट्रल मिलिटरी कमिशन सदस्य असलेला तो मोजक्या नेत्यांपैकी एक होता. जवळपास ५० वर्षे माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या बसवराजूवर १.५ कोटी रुपयांचे बक्षीस होते. अनेक हिंसक हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड होता. त्याने एलटीटीईकडून प्रशिक्षण घेतले होते आणि आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवरच्या हल्ल्यासारख्या १७० पेक्षा जास्त हल्ल्यांचे आयोजन केले होते.