
काही साहित्यकृती कोणत्याही माध्यमांत बघितल्या तरी त्यांचं मोठेपण अबाधित राहतं. उदाहरणार्थ, केन केसी या अमेरिकन लेखकाची कादंबरी ‘वन फ्लू ओव्हर द कुकुज नेस्ट’... ही कादंबरी एक साहित्यकृती म्हणून दर्जेदार आहे. त्याचप्रमाणे त्यावर आधारित सिनेमा आणि अलीकडेच बघितलेलं नाटक तितकंच प्रभावी आहे. त्याचप्रमाणे काही साहित्यकृती मुद्रित माध्यमात थोर वाटतात. त्यांचा आशय इतका तात्त्विक स्वरूपाचा असतो, की त्यावर आधारलेलं नाटक-सिनेमा प्रभावी होत नाही. अनेकदा तर त्यांच्यावर आधारलेले सिनेमे बघवत नाहीत. याचं एक उदाहरण म्हणजे, अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही कादंबरी. हेमिंग्वेची ही कादंबरी प्रचंड गाजली.
ती १९५२ साली प्रसिद्ध झाली आणि १९५४ मध्ये हेमिंग्वेला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. नंतर १९६० साली या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट आला. त्यात म्हाताऱ्याची भूमिका स्पेंसर ट्रासी या अतिशय गुणी नटाने केली होती. तरी चित्रपट चालला नाही. याचं साधं कारण म्हणजे सर्व चांगल्या साहित्यकृतींत ‘नाट्यमयता’ असतेच, असं नाही; मात्र अशी नाट्यमयता ‘वन फ्लू ओव्हर द कुकुज नेस्ट’मध्ये ओतप्रोत भरली आहे. म्हणूनच कादंबरीप्रमाणे त्यावर आधारलेला सिनेमा आणि नाटक दर्जेदार ठरतात.