

AI Mission Profit vs Non Profit Dispute
esakal
ब्रिजेश सिंह-brijeshbsingh@gmail.com
अमेरिकेतील कोर्टात सध्या दोन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सुरू भांडणाचा खटला सिलिकॉन व्हॅलीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा खरा उद्देश काय असावा, याबद्दलचा हा वाद आहे. या खटल्यात एक मोठा प्रश्न आहे : ज्या उद्योगात दररोज कोट्यवधी रुपये खर्च होतात तिथे एखाद्या चांगल्या उद्देशासाठी सुरू केलेल्या संस्थेचे अस्तित्व टिकू शकते का?
अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातील कोर्टात सध्या फक्त दोन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील भांडण सुरू नाहीय. त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा खरा उद्देश काय असावा, याबद्दलचा हा वाद आहे. या खटल्यात फक्त एखाद्या कंपनीची मालकी कुणाची असावी किंवा १३० अब्ज डॉलर्सची भरपाई मिळावी का, एवढेच प्रश्न नाहीत. त्याऐवजी, एक मोठा प्रश्न आहे : ज्या उद्योगात दररोज कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि जिथे पैशाची गरज कमाईपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, तिथे एखाद्या चांगल्या उद्देशासाठी सुरू केलेल्या संस्थेचे अस्तित्व टिकू शकते का?
जेव्हा एखादी संस्था सुरुवातीला म्हणते, की ‘आम्ही नफा कमवणार नाही, आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम करू’... पण नंतर पैसे गोळा करण्यासाठी आपली रचना बदलते, तेव्हा कायदा त्याला विश्वासघात मानतो की काळाची गरज? या कोर्टातील केसमुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे : अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागणाऱ्या तंत्रज्ञानाला एखादी धर्मादाय संस्थेची नियमावली बांधून ठेवू शकते का?