
युगांक गोयल
महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख वीज उत्पादक, अक्षय ऊर्जानिर्मितीत अग्रेसर राज्य आहे. त्याच वेळी जीवाश्म इंधनाशी संबंधित प्रमुख प्रक्रिया करणारेही हेच राज्य आहे. महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक पायाच्या विस्ताराचा अर्थ असा आहे, की हे राज्य आगामी काळात ऊर्जा वापर करणारे हे महत्त्वाचे राज्य असेल. ‘भारतातील ऊर्जा क्षेत्राची सांख्यिकीय आकडेवारी २०२५’ या वार्षिक
अहवालाद्वारे महाराष्ट्राचे या क्षेत्रातील बहुआयामी योगदान अधोरेखित होते. त्याविषयी... भारताच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ‘भारतातील ऊर्जा क्षेत्राची सांख्यिकीय आकडेवारी २०२५’ हा वार्षिक अहवाल नुकताच २५ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केला. आजच्या लेखात आम्ही या अहवालाचा आढावा घेणार आहोत. हा तपशीलवार सविस्तर अहवाल भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा सखोल आढावा घेतो आणि ऊर्जा विकासासंबंधी धोरणे ठरवण्यासाठी तसेच जनतेला माहिती मिळवण्यासाठी महत्त्वाचा संदर्भबिंदू ठरतो.