

Venezuela Crisis
esakal
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला येथे जे काही घडले त्यामागे त्या देशातील सुशासनाचा ठार अभाव ( गव्हर्नन्स डेफिसिट) हे एक मुख्य कारण ठरते. या कुशासनाचे दोन मुख्य पैलू म्हणजे लोकशाहीची गळचेपी आणि अर्थव्यवस्था पार खिळखिळी करून टाकणारा कारभार हे होत... महत्त्वाच्या जागतिक घडामोडींचा वेध घेणारे नवे पाक्षिक सदर.
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात काही दिवसांपूर्वी जे घडले ते अनेक संदर्भात जगातील सर्व लोकशाहीनिष्ठ लोकांना विचार करायला लावणारे आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांची कारकीर्द, त्यांच्या शासन-शैलीतील उघड-उघड हुकूमशाही प्रवृत्ती, भ्रष्टाचार आणि कुशासनाने पोखरलेले त्यांचे प्रशासन हे सर्व जितके अभद्र आणि निषेधार्ह होते, तितकेच अमेरिकी सैन्याने निकोलस मादुरो यांना ‘न्यायाचा सामना करण्यासाठी’ अपदस्थ करून नंतर व्हेनेझुएलातून बाहेर काढणे हेदेखील निखालस निंद्य अन् चिंताजनकच ! तीन जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेच्या विशेष दलांनी निकोलस मादुरो यांना रातोरात केलेली अटक ही शीतयुद्धोत्तर जगात लॅटिन अमेरिकेत घडून आलेली थेट हस्तक्षेपाची सर्वाधिक नाट्यपूर्ण घटना मानली जातेय. आता पुढे काय? हा एक कळीचा प्रश्न उरतोच पण हा जो घटनाक्रम घडून आला त्याच्या मुळाशी त्या देशातील सुशासनाचा ठार अभाव (गव्हर्नन्स डेफिसिट) हे एक मुख्य कारण ठरते. या कुशासनाचे दोन मुख्य पैलू म्हणजे लोकशाहीची गळचेपी आणि अर्थव्यवस्था पार खिळखिळी करून टाकणारा कारभार हे होत !