

Intellectual growth through books
esakal
पुस्तकांच्या दुकानात काम करणारा कामगार किंवा मालक दिवसभर पुस्तकांच्या गराड्यात असतो म्हणून आपण त्याला वाचक म्हणू शकत नाही. अगदी तसंच ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचं एकही पुस्तक नाही, याचा अर्थ असा होत नाही, की तो वाचक नाही. काहीही असो; आपलं अंतिम ध्येय वाचन असलं पाहिजे न की वाचनाचं ढोंग...
घरातील पुस्तकांच्या मोठ्या कपाटाकडे बघत माझा मित्र म्हणाला, ‘अरे वा! एवढी पुस्तकं आहेत तुझ्याकडे?’ माझ्या चेहऱ्यावरील अभिमान मला लपवता आला नाही. ‘मला खूप आनंद झाला, तुझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत हे बघून’ असं म्हणत तो पुस्तकांच्या कपाटाकडे गेला. आपली मान वाकडी करून कपाटातील पुस्तकांची नावं वाचू लागला. ‘अरे तुझ्याकडे हे पुस्तक आहे... ते पुस्तक आहे. तू हे वाचलं का? तू ते वाचलं का? हे जबरदस्त आहे, ते मस्त आहे, ते ठीक आहे...’ असं म्हणू लागला. त्याच्या आवाजातही आनंद जाणवू लागला. भूक लागलेला माणूस काचेच्या आत ठेवलेल्या अन्नपदार्थाकडे जसा अधाशा नजरेने बघतो, अगदी तसाच तो त्या कपाटातल्या पुस्तकांकडे बघत होता. तो बराच वेळ त्या कपाटाच्या आजूबाजूला रेंगाळला. शेवटी कपाटाकडे बघत बघतच तो खुर्चीमध्ये बसला. कपाटाकडून त्याने नजर काढली आणि माझ्या डोळ्यांत बघत त्याने मला प्रश्न केला, ‘तू वाचक आहेस की पुस्तकप्रेमी?’ मी प्रश्नार्थक नजरेने हलकंसं स्मित केलं. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला, ‘तू वाचक आहेस की पुस्तकप्रेमी?’ या वेळी मात्र माझ्या चेहऱ्यावरील स्मित उडून गेलं. ‘म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?’ मी त्याला उलट प्रश्न केला. ‘मला हे म्हणायचं आहे, की तुला वाचन करायला आवडतं की पुस्तकांवर प्रेम करायला आवडतं...?’ त्याने पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या स्वरूपात विचारला. ‘तुझा प्रश्न मला समजला; पण तू असं का विचारतो आहेस?’ मी... ‘कारण वाचायला आवडतं म्हणून मी पुस्तकांवर प्रेम करू शकतो आणि पुस्तकांवर माझं प्रेम आहे म्हणून मी आवडीने वाचतो...’ आता स्मित माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर होतं.