
युगांक गोयल, सहयोगी प्राध्यापक, ‘फ्लेम’ विद्यापीठ संचालक, ‘सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ह’
दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने ‘आप’वर निर्णायक विजय मिळविला. २७ वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेवर आला आहे. गेल्या एक तपापासून ‘आप’ने दिल्लीच्या राजकारणावर हुकूमत गाजविली. मात्र, या निवडणुकीत त्यांना दिल्लीवासीयांनी नाकारले. यामागची नेमकी कारणे काय आहेत, याचे आकड्यांद्वारे केलेले विश्लेषण...
दिल्ली निवडणूक गाजली ती आम आदमी पक्षाच्या (आप) पराभवामुळे... निकालापूर्वी झालेल्या बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांत (एक्झिट पोल) आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात (भाजप) चुरशीची लढाई होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मात्र, भाजपने या निवडणुकीत निर्णायक विजय मिळवत चुरशीच्या राजकीय संघर्षाचा अंदाज खोटा ठरविला. त्यामुळे मतदानोत्तर चाचण्यांचे अनेकदा समोर आलेले अविश्वसनीय स्वरूप पुन्हा एकदा अधोरेखित झाले.