
भारतीयांच्या गोष्टीवेल्हाळ देशात सिनेमाने लोकांना चांगलेच गुंतवून ठेवले होते. खास महिलांसाठी ‘सुहाग सिंदूर’ तर निखळ मनोरंजनासाठी हुकुमी ‘अलीबाबा चाळीस चोर’ तसे ‘आफ्रिका’, फूजिलामा’, ‘खैबर’ असेसुद्धा येत होते आणि चित्रपट कोणत्याही विषयांचे असोत गाणी मात्र पाच-सात असायचीच. नक्षत्रांकित आभाळ असावे असा रणजित स्टुडिओ मात्र हळू हळू शेवटाकडे पावलं टाकत होता. सरदार चंदूलाल शहा यांचा दबदबा मात्र अजून ओसरला नव्हता. म्हणून ऐन बहरात असलेल्या राज कपूर, नर्गिसला घेऊन चित्रपट काढायचं त्यांनी ठरवलं असावं. पण ‘पापी’मध्ये राज-नर्गिस असूनही यश आले नाहीच. तीच गोष्ट ‘फूटपाथ’ चित्रपटाची. दिलीपकुमार-मीनाकुमारी असे खंदे अभिनेते होते.
तरीही ‘फूटपाथ’ची एक खूण मात्र राहिली, ती म्हणजे तलत मेहमूद यांनी गायलेलं ‘शाम-ए गम की कसम’ हे नितांत सुंदर गाणं! याचे संगीतकार होते खय्याम! फार वर्षांपूर्वी संघर्ष, उमेदवारीच्या काळात खय्यामना एक संधी आली होती, संगीत देण्याची! त्या वेळी त्यांनी काही चाली ऐकवल्या. निर्माता म्हणाला ‘या कसल्या चाली? नौशाद साहेबांसारख्या करा!’ स्वभावाने मानी, सच्चे आणि स्वयंभू विचाराचे खय्याम चित्रपट सोडून निघाले; पण एक चाल त्यांचा पाठलाग सोडत नव्हतीच. मग ‘फूटपाथ’च्या वेळी मजरूहसाहेबांनी गाणं लिहिलं. ‘शाम-ए-गम की कसम, आज गमगीं है हम, आभी जा आज मेरे सनम...’ उर्दू साहित्यात तिन्ही सांजेला वाटणारी हुरहूर, उदासीनता यावर विपुल लिहिलं गेलं आहे. ‘शाम-ए-गम’बरोबरच एकलेपण, विरहाचं दुःख असं काही दाटून आलं आणि त्याला तलतसारखा मखमली, मुलायम, मधाळ, मोरपंखी अशी सगळी विशेषणं लावावीत असा आवाज लाभला आणि एक जादू घडली.