

Marathi Actor Journey
esakal
डॉ. मिलिंद शिंदे
२६ तारीख जवळ येत होती... आणि जरी आपण नाटक सोडायचं म्हटलं. काही मार्गच नाही निघाला तर पर्यायी कलाकार तयार करायला वेळ लागणार म्हणून मी तातडीनं चंद्रलेखाला सांगावं.. मोहनकाकांना सामोरं जाण्यास हिंमत बांधता येत नव्हती... पण उशीर करूनही चालणार नव्हतं... कुठली तरी एक बाजू घेणं गरजेचं होतं. सिनेमा की नाटक...? मोहन वाघ की गजेंद्र अहिरे? चंग बांधला... पुन्हा सोडला... मग बांधलाच. बूथवरून आकडे फिरवले. थेट मोहन वाघांना सांगितलं... ‘‘काका... मला इथून पुढे नाटक करायला नाही जमणार.’’ शांतता... शांतता... आणखी शांतता... पलीकडून आता काय आणि किती ऐकावं लागणार... अनेक विचार येऊन गेले... ‘‘फोन ठेव... परत फोन करू नकोस...’’ खटकन फोन ठेवला गेला... तो कडक आवाज मोठ्या स्फोटासारखा वाटला.
सव्वीस तारखेचं काय करायचं..? डोक्यात सगळा कॅलेंडरचा नाच सुरू होता... आता सांधा बदलायचाच आहे ठरवलं होतं. मनामनात लपवाछपवी चालली होती. एक मन दुसऱ्याला म्हणे, तुला माहीतंय का? काय ठरलंय ते..? तर दुसरं म्हणायचं अजून काही नक्की नाही. ठरायचंय अजून... असा तराजूचा खेळ, वजनमापाचा खेळ मनामध्ये रंगत होता. त्रास खूप होत होता. कॅलेंडरला तारखांचं बायपास करायचंय, चकवा द्यायचाय पण तयारी, प्लॅन काहीच नाही... नव्हता...
२६ जानेवारी तारीख... शिवाजी मंदिर. चंद्रलेखा संस्थेचे प्रयोग... हो... सगळेच्या सगळे चंद्रलेखा संस्थेचे प्रयोग. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, सगळेच्या सगळे. चंद्रलेखा कंपनीने प्रयोग लावले होते. तेव्हा चंद्रलेखा कंपनीची जितकी नाटकं चालू होती त्या सगळ्यांचे प्रयोग एका मागोमाग एक असे होणार होते. चंद्रलेखाच्या नाटकांचा महोत्सव तो. माझ्यासोबत काय झालं होतं... प्रयोग रात्री ८.३०ला होता (‘फुलराणी’ नाटकाचा). मी पुण्यात गजेंद्र अहिरेच्या सिनेमाचं शूटिंग सकाळपासून ते दुपारी २ ते २.३०पर्यंत करणार होतो आणि ठरल्याप्रमाणे गजेंद्र मला २.३०ला सोडणार होता... आणि मी पुण्याहून निघून दादरच्या शिवाजी मंदिरला होणाऱ्या रात्रीच्या ८.३०च्या प्रयोगाला पोहोचणार होतो; पण ८.३०चा प्रयोग अचानक दुपारी २.३०ला किंवा ४.३०ला होणार, अशी बातमी मिळाली. आता काय करायचं..?