

Global Fuel Crisis 2026 Impact
esakal
अभय टिळक - saptrang@esakal.com
ऊर्जावापराची एक नवीन आणि प्रगल्भ संस्कृतीच आपल्याला येथून पुढे अंगी बाणवून घ्यावी लागेल. पंतप्रधानांनी त्यासाठी आवाहन केलेले आहे ते आपल्या देशभक्तीला. परंतु, तेवढ्याने भागणार नाही. भक्तीला जोड द्यावी लागेल ती जगण्याची नवीन रीत मनोभावे अंगीकारण्याचे व्रत निरलसपणे जपण्याची!
राजकारण आणि अर्थकारण या दोन प्रांतांचे स्वभाव आणि कार्यप्रवृत्ती एकमेकांपेक्षा अगदी निराळी असते. राजकारण प्रतिसाद देते तात्कालिकाला, तर अर्थकारणाला भान ठेवावे लागते सुदूर भविष्याचे. त्यामुळे राजकीय व्यासपीठांवरून नेते ज्या वेळी एखादी भावनिक साद घालतात, तेव्हा तिला पार्श्वभूमी लाभलेली असते ती तात्कालिकाची. परंतु, काही प्रसंग असे निर्माण होतात की, प्रचलित परिस्थितीची तोंडमिळवणी कशीबशी करण्यासाठी राजकीय व्यवस्थेतील धुरीण जी आवाहने करतात त्यांना संदर्भ जरी समकालीन आव्हानांचा असला तरी, त्यांची प्रस्तुतता केवळ वर्तमानापुरती मर्यादित नसते. तशा आवाहनांना समाजमनाकडून दिला जाणारा प्रतिसाद भविष्यातील चित्राचे रंग निश्चित करत असतो. २८ फेब्रुवारी २०२६ पासून आखातामध्ये भडकलेल्या संघर्षापायी उभ्या जगाचीच जी इंधनकोंडी झालेली आहे तिच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या देशभक्तीला केलेले आवाहन त्यादृष्टीने समजावून घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या त्या नऊ कलमी कार्यक्रमावर समाजाच्या विविध स्तरांतून उमटलेल्या संतापाच्या, हतबलतेच्या प्रतिक्रिया साहजिक आणि म्हणूनच समजण्याजोग्या असल्या तरी, त्या आवाहनाला विवेकी प्रतिसाद देण्याखेरीज गत्यंतर नाही, हे जितके प्रकर्षाने व लवकरात लवकर आपल्याला उमजेल, तितके ते सार्वत्रिक हिताचे सिद्ध होईल.