

Robotic Dogs
esakal
आज आपण इतिहासाच्या एका अशा वळणावर उभे आहोत, जिथे ‘माणसाचा सर्वात जवळचा मित्र’ असलेली कुत्र्याची हजारो वर्षांची संकल्पनाच बदलत आहे. हे एआय-पॉवर्ड रोबो-कुत्रे माणसाच्या आदेशाचे पालन करणारे ‘सेवक’ आहेत, तोपर्यंत ते प्रगतीचे लक्षण आहेत. पण ज्या दिवशी ते केवळ स्वतःच्या अल्गोरिदमवर चालायला लागतील, तो दिवस भयानक वळण ठरेल.
म्हाला ‘टर्मिनेटर’ किंवा ‘ब्लॅक मिरर’सारख्या मालिका आठवतात? ज्यात दाखवले जायचे, की भविष्यात यंत्रमानव किंवा रोबो जगावर राज्य करतील किंवा माणसाच्या बरोबरीने चालतील. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे सर्व आपल्याला केवळ विज्ञानकथा (Science Fiction) किंवा हॉलीवूडच्या चित्रपटांमधील कल्पनाशक्तीचा भाग वाटत असे; पण आज २०२५ साल उजाडले आणि आपल्या लक्षात आले, की भविष्यातील ते ‘फिक्शन’ आता ‘फॅक्ट’ बनून आपल्या डोळ्यांसमोर उभे ठाकले आहे.
हे तंत्रज्ञान आता केवळ प्रयोगशाळेच्या चार भिंतींत अडकून राहिलेले नाही; तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा, उद्योगांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा एक अविभाज्य भाग बनू लागले आहे. या महाकाय बदलाचे सर्वात ठळक आणि जिवंत प्रतीक म्हणजे ‘रोबोटिक डॉग्स’ (Robotic Dogs) किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर - ‘यांत्रिक कुत्रे’... चार पायांवर चालणारी, कधीही न थकता अहोरात्र काम करणारी आणि आता ज्यांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची (एआय) प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभली आहे, अशी ही यंत्रे मानवी आयुष्यात नक्की काय क्रांती घडवत आहेत? हा बदल आपल्या फायद्याचा आहे, की ती धोक्याची घंटा आहे? हे समजून घेणे आजच्या डिजिटल युगात प्रत्येक सजग नागरिकासाठी अत्यंत गरजेचे आहे.