
नंदिनी नरेवाडी
गेल्या काही वर्षांत ठुशींमध्ये बदलही झाले. ठुशीच्या मध्यभागी असलेल्या पाचू, माणकांची जागा मोराने घेतली, तर पॉपकॉर्न पाइप स्टाइल ठुशी, प्लेटेड पेंडंट ठुशी व कुडी स्टाइल ठुशी हे ठुशीचे मॉडर्न प्रकारही कारागिरांनी साकारले. ठुशी इमिटेशनमध्ये मिळू लागल्याने प्रत्येक साडीवर मॅचिंग ठुशी घेतली जाऊ लागली. त्याच्या किमतीही अगदी शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत असल्याने महिलांच्या पर्सलाही त्या परवडू लागल्या.
कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईला दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांनी इमिटेशन ज्वेलरी घ्यावी, यासाठी काही व्यावसायिक अगदी स्टुलावर उभे राहून कोणताही दागिना ‘शंभर रुपये’ अशी आरोळी देत असतात. यामध्ये कोल्हापुरी ठुशीचाही समावेश आहे. गोल मण्यांचा ओवलेला गोफ आणि मध्यभागी चिकटवलेले माणिक किंवा पाचूसारखे दिसणारे खडे अशी साधी डिझाईन असलेला हा दागिना महिलांच्या नजरेत भरतो आणि पटकन तो खरेदीही केला जातो.