

Maratha History and Adilshahi Conflict
esakal
शिवाजीराजांनी २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा व अन्य प्रदेश जिंकल्यानंतर त्याची लष्करी व प्रशासकीय घडी बसविली. जिंकलेल्या भागांतून नव्याने सैन्य व अन्य कुशल लोकांची भरती केली. त्यांना प्रशिक्षण दिले; पन्हाळ्यासह अन्य लष्करी ठाण्यांची डागडुजी वेगाने सुरू केली; सर्वत्र हेर पाठवून बातम्या मिळविल्या; आदिलशाही मुलुखात संचार करणाऱ्या आपल्या सैन्याला सर्व सामग्री पुरविली.
जावळीतून वाचून पळालेले मूसेखान व अन्य सरदार विजापूरला पोहोचले होते. शिवाजीराजे वाईला आले असून ते पन्हाळ्यावर चालून येतील अशी बातमी आदिलशाहाला तोपर्यंत हेरांकडून समजलेली होती. अफजलसारख्या बलाढ्य सरदारास मारून त्वरेने मुलूख जिंकल्यामुळे आदिलशाही पूर्णतः हादरली होती. आता तातडीने शिवाजीराजांविरुद्ध पुन्हा सैन्य पाठविणे आवश्यक होते. कोल्हापूर व राजापूर प्रांताची जहागिरी रुस्तुम-इ जमान याच्याकडे होती. राजांनी त्याचा प्रांत हस्तगत केल्यामुळे तोही सूडाने पेटलेला होता. त्यामुळे अली आदिलशाहाने रुस्तुमला या मोहिमेवर जाण्याचा आदेश दिला.
रुस्तुम-इ जमान हा फर्रादखानाचा नातू व रणदुल्लाखानाचा मुलगा होता. रणदुल्ला, रुस्तुम आणि शाहजीराजे यांचा पूर्वीपासूनचा स्नेह होता. रायबाग, कोल्हापूर, राजापूर, कारवार व हुक्केरी या भागाची जहागिरी रुस्तुमकडे होती. अशाप्रकारे अली आदिलशाहाने रुस्तुम-इ जमान याच्या हाताखाली मुसेखान, फाजलखान (अफजलखानाचा पुत्र), मलिक इतबार सादात, फतहखान (अजीजखानाचा पुत्र), मुल्ला यह्या (मुल्ला हय) व अनेक सरदारांची नेमणूक केली व पक्ष्यांप्रमाणे रात्रंदिवस अविश्रांतपणे चाल करण्याची आज्ञा केली (शि.भा.२ ३।१६-२०). अफजलवधानंतर विजापूरास आलेल्या सरदारांचे सैन्यही या मोहिमेत पाठविण्यात आले. तसेच हुबळी व अन्य प्रांतातील अधिकाऱ्यांना रुस्तुमला सामील होण्यासाठी फर्माने पाठविण्यात आली. याशिवाय सगळीकडून रोज घोडेस्वारांची व पायदळांची भरती करण्यात आली.