

AI Financial Privacy Risks
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
एआय चॅटबॉट्समुळे आर्थिक सल्ला घेणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे; परंतु त्या बदल्यात आपण नकळत आपले बँक खाते, कर्ज, पगार आणि इतर संवेदनशील आर्थिक माहिती डिजिटल विश्वात उघड करत आहोत. एआयची उपयुक्तता निर्विवाद असली, तरी गोपनीयतेची किंमत मोजून ती स्वीकारणे कितपत शहाणपणाचे आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
आज कोट्यवधी भारतीय शांतपणे आपली अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय आर्थिक माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ चॅटबॉट्सच्या स्वाधीन करत आहेत. धक्कादायक म्हणजे, आपण जे काही टाईप करत आहोत त्याचा वापर भविष्यात कधीतरी आपल्याच विरुद्ध केला जाऊ शकतो, याची पुसटशी जाणीवही अनेकांना नसते. एखादा युझर बजेटिंगचा सल्ला घेण्यासाठी क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट चॅटबॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करतो; तर कोणीतरी कर नियोजनाविषयी विचारण्यासाठी स्वतःच्या पगाराचा आकडा बिनदिक्कत शेअर करतो. काही जण तर थेट आपल्या कर्जाची थकबाकी, मासिक हप्ते आणि बँकांची नावे यांसारखी संवेदनशील माहिती चॅटबॉक्समध्ये सर्रास टाकतात; कारण आर्थिक सल्लागाराची भेट घेण्यापेक्षा मोबाईलवर एका क्लिकवर माहिती मिळवणे त्यांना सोपे अन् सोयीचे वाटते.
पण लक्षात घ्या, या प्रत्येक संवादाचा एक डिजिटल माग (डिजिटल ट्रेस) मागे उरत असतो आणि चॅटबॉक्सची ती विंडो किंवा संवाद संपल्यानंतरही हा डिजिटल डेटा कधीच नष्ट होत नाही. येथे खरा प्रश्न एआय चॅटबॉट्स उपयुक्त आर्थिक मार्गदर्शन करू शकतात की नाही, हा नाहीच; कारण ते नक्कीच उत्तम मार्गदर्शन करू शकतात. मूळ प्रश्न असा आहे, की केवळ तात्पुरत्या सुविधेसाठी आपण एवढा मोठा धोका पत्करणे योग्य आहे का? जर हा डेटा चुकीच्या लोकांच्या हाती लागला, तर ओळख चोरी (आयडेंटिटी थेफ्ट), टार्गेटेड फ्रॉड (नियोजित फसवणूक) किंवा अत्यंत हुशार फिशिंग हल्ल्यांना आपण स्वतःच आमंत्रण देण्यासारखे आहे. डिजिटल वित्तीय समावेशनाकडे (डिजिटल फायनान्शियल इन्क्लुजन) वेगाने धावणाऱ्या भारतासारख्या देशात, या वाढत्या चिंतेवर आता अत्यंत प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने चर्चा करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.