

Artificial Intelligence
esakal
जकाल आपल्या घराघरांमध्ये एक विचित्र शांतता जाणवते. पूर्वी जी घरे मुलांच्या किलबिलाटाने, मित्रांच्या हाकांनी आणि फोनवर चालणाऱ्या तासन्-तास गप्पांनी गजबजलेली असायची, तिथे आता एक वेगळीच निःशब्दता पसरली आहे. आपली मुले आजूबाजूलाच असतात, त्यांच्या खोलीत असतात; पण त्यांच्या मनात नक्की काय चाललंय, याचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही. एकेकाळी मित्र-मैत्रिणींशी सुख-दुःखे वाटून घेणारी ही पिढी आता एका अशा मित्राशी संवाद साधण्यात रमली आहेत, ज्याला ना शरीर आहे, ना चेहरा, ना मन आणि ना स्वतःचे अस्तित्व... हा मित्र कधीच झोपत नाही, कधीच थकत नाही, तुमच्यावर कधीच चिडत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जे बोलता त्याला तो कधीच ‘नाही’ म्हणत नाही. हा मित्र आहे - ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘चॅटबॉट’.