विनायक पवार
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी करण्यास राज्य सरकारने सांगितले होते. त्याचे मूल्यमापन केल्यानंतर राज्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयांमध्ये पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत विविध सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आले.
महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कामकाज व तक्रार निवारण कामकाजाचे मूल्यमापन, सुकर जीवनमान, स्वच्छता, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, नवीन कायद्याचा प्रसार व प्रसिद्धी आणि नावीन्यपूर्ण उपक्रम आदी कार्यक्रम राबवण्यात आले.