

AI in Digital Marketing
esakal
पराग गोरे - paragdgore@gmail.com
एका छोट्या व्यवसायाच्या मालकाने आपल्या दुकानासाठी ‘इन्स्टाग्राम’वर जाहिरात करण्याचे ठरवले. पूर्वी अशा जाहिरातीसाठी त्याला एखाद्या डिझायनरची मदत घ्यावी लागायची, मजकूर लिहिण्यासाठी वेळ द्यावा लागायचा आणि अनेक पर्याय तयार करून त्यातून एक निवडावा लागायचा. आज त्याने फक्त काही ओळी लिहिल्या आणि काही क्षणांत त्याच्यासमोर जाहिरातींचे अनेक पर्याय तयार झाले. हे पाहून तो खूश झाला. काम इतके सोपे झाले होते; पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले, की जाहिरात तयार करणे सोपे झाले असले, तरी ग्राहकाला ती का आवडेल, त्याने त्यावर विश्वास का ठेवावा आणि त्यातून प्रत्यक्ष खरेदी का करावी, या प्रश्नांची उत्तरे अजूनही तितकीच कठीण आहेत. हीच आजच्या ‘डिजिटल मार्केटिंग’ची खरी गोष्ट आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मार्केटिंगमधील अनेक कामांचा वेग वाढला आहे. कंटेंट तयार करण्यापासून जाहिरातींच्या कल्पना सुचवण्यापर्यंत, ग्राहकांची माहिती समजून घेण्यापासून कॅम्पेनचे विश्लेषण करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता पूर्वीपेक्षा कमी वेळात करता येतात; पण मार्केटिंग म्हणजे केवळ कंटेंट, तंत्रज्ञान किंवा वेग नव्हे. शेवटी मार्केटिंग म्हणजे योग्य ग्राहकाला योग्य वेळी योग्य गोष्ट सांगणे आणि त्याच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करताना आणि गेल्या काही वर्षांत ‘एआय’मधील बदल जवळून पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. ‘एआय’मुळे मार्केटिंगची कामे बदलत आहेत; पण मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे अजूनही तीच आहेत. मग नेमके काय बदलले आहे? ‘एआय’ येण्यापूर्वी ‘डिजिटल मार्केटिंग’ कसे केले जायचे आणि आज ‘एआय’मुळे त्यात काय फरक पडला आहे? या बदलांचा छोट्या-मोठ्या व्यवसायांवर नेमका काय परिणाम होणार आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधताना ‘एआय’कडे केवळ एक नवे तंत्रज्ञान म्हणून नव्हे, तर व्यवसायाच्या दैनंदिन कामात उपयोगी पडणारे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे.
‘एआय’चा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होण्यापूर्वी ‘डिजिटल मार्केटिंग’ ही मुख्यतः मानवी वेळ, कौशल्य आणि अनुभवावर चालणारी प्रक्रिया होती. एखाद्या व्यवसायासाठी सोशल मीडिया कंटेंट तयार करायचा असेल, तर आधी विषय शोधणे, ग्राहक कोण आहे हे समजून घेणे, कंटेंट लिहिणे, डिझाइन तयार करणे आणि त्यानंतर तो योग्य प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करणे, या सर्व गोष्टींसाठी वेळ द्यावा लागायचा. जाहिरातींच्या बाबतीतही प्रत्येक क्रिएटिव्ह, हेडलाइन आणि कॅम्पेनची कल्पना स्वतंत्रपणे तयार करावी लागायची.
एखाद्या जाहिरातीचे दोन-तीन पर्याय तपासायचे असतील, तर त्यासाठी पुन्हा कंटेंट आणि डिझाइन तयार करावे लागायचे. ग्राहकांचा अभ्यास आणि स्पर्धकांचे विश्लेषण करण्यातही मोठ्या प्रमाणावर हाताने काम करावे लागायचे. गुगल सर्च,
सोशल मीडिया, ग्राहकांचा अभिप्राय, बाजारपेठेचे अहवाल आणि उपलब्ध माहिती यांचा अभ्यास करून मार्केटिंगविषयक निर्णय घ्यावे लागत. म्हणजेच, ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये कल्पना माणूस करायचा, कंटेंट माणूस तयार करायचा आणि त्याचे विश्लेषण करून पुढचा निर्णयही माणूसच घ्यायचा.
प्रत्येक ब्रँडची भाषा आणि संवादशैली त्याच्या अनुभवातून तयार होत असे. आज ‘एआय’मुळे या प्रक्रियेतील अनेक कामे काही मिनिटांत करता येतात. त्यामुळे बदल केवळ कामाचा वेग वाढण्यापुरता मर्यादित नाही; तर मार्केटिंगसाठी लागणारा वेळ आणि संसाधने यांचे समीकरणच बदलत आहे. मात्र, याच ठिकाणी पुढचा प्रश्न निर्माण होतो. ‘एआय’ आणि ‘डिजिटल मार्केटिंग’मधील वेगाने होत असलेल्या बदलांमुळे नेमकी कोणती कामे बदलली आहेत आणि त्याचा व्यवसायाला प्रत्यक्ष फायदा किती होतो?