

Degrees vs Skills: Why the Traditional Education System Is Under Pressure
E sakal
Empty Classrooms and Smart Tools: Is College Education Losing Relevance?
डॉ. मिलिंद वाटवे, शिक्षणाचे अभ्यासक व विज्ञान संशोधक
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑनलाइन साधने ही शिक्षकांचे स्पर्धक किंवा पर्याय नाहीत. ती त्यांचे मित्र आहेत. माहिती देणे सोपे झाल्यामुळे त्याच्यापलीकडच्या शिक्षणाकडे पाहायला आता नव्याने वेळ मिळेल. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके जिथे संपतात तिथे शिकवण्याची सुरुवात करता येईल.
बहुतेक महाविद्यालयांमधून गेल्या काही वर्षांत एकच तक्रार ऐकू येत आहे आणि ती म्हणजे वर्गात विद्यार्थीच नाहीत. एक तर अनेक विषयांना आता जागा भरतही नाहीत, आणि जे विद्यार्थी पटावर असतील ते वर्गात बसतीलच असेही नाही. तळमळीने शिकवणाऱ्या अनेक प्राध्यापकांशी चर्चा करताना मला हा निराशेचा सूर खूपदा ऐकू येतो. यावर मी असा विचार करतो की मी स्वतः जर आज विद्यार्थी असतो तर तासाला बसलो असतो का? तासाला बसल्याने मला काय मिळते? तर एखाद्या विषयाची माहिती. ती माहिती उपयुक्त नक्कीच असते. पण त्यासाठी एक तास लेक्चर ऐकून मी जी दीड-दोन पाने टिपणे काढली असती, ती मला आज घरच्या घरी बसून माझ्या लॅपटॉपवर दीड मिनिटात मिळतात. मग मी तासाला बसेन का?